भौतिक प्रगतीसाठी बेभान व बेधुंद झालेल्या मानवाला कोरोनाच्या माध्यमातून निसर्गाने लगाम खेचून मानवाचे अस्तित्व दाखवून दिले आहे. कोरोना या वैश्विक महामारीतून पृथ्वीवरील प्रत्येकाने बोध घेऊन सर्व सजीवांच्या भविष्यातील अस्तित्वाकरिता निसर्गाचा सन्मान राखत कृतीशील विचार करण्याची गरज आहे. निसर्गामध्ये सर्व सजीवांत मानव हा बुद्धिमान व विचार मंथन करणारा प्राणी आहे. स्वतःची बुद्धिमत्ता वापरून वैज्ञानिक ज्ञानाच्या जोरावर नैसर्गिक संसाधनांचा वापर करीत मानवाने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक भौतिक प्रगती केली आहे. हे जरी खरी असले तरीही निसर्गात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या सह्संबधांकडे जराही लक्ष दिले नाही. स्वतःचेच जीवन सुखदायी करणाऱ्या मानवाला भौतिक प्रगतीच्या हव्यासापोटी नैतिक व नैसर्गिक मुल्यांचा विसर पडत चालला आहे. अघोरी विकासाच्या मोहजालामध्ये अडकलेल्या मानवाकडूनच नैसर्गिक संसाधनांची अपरिमित हानी होऊन आज अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचा फटका मानवासहित पृथ्वीवरील सर्व सजीवांना बसत आहे. कोरोना सारख्या वैश्विक महामारीतून स्वतः ला वाचविण्यासाठी माणूस अहोरात्र प्रयत्न करीत आहे.हे जरी कौतुकास्पद असले तरी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत माणसाची संवेदनशीलता हरवत चालली आहे.
आपले आरोग्य, साधन सामुग्रीच्या सुरक्षेतेविषयी जागरूक असणारे सामान्य लोक मात्र ओझोन संरक्षणाविषयी अनभिज्ञ आहेत. *सजीवांची कवच कुंडले असणाऱ्या ओझोन थराचा क्षय ही सजीवांच्या दृष्टीने धोकादायक समस्या बनत चालली आहे.*
म्हणून ओझोन क्षयाबाबत जनजागृती होणेकरिता *१६ सप्टेंबर हा “जागतिक ओझोन दिन”* म्हणून सर्वत्र संपन्न केला जातो.
जीवसुष्टीची कवच कुंडले असलेला वातावरणातील ओझोनचा थर म्हणजे निसर्गाचा परिपूर्ण असा समतोल आहे. परंतु मानवाने केलेल्या भौतिक प्रगतीमुळे ओझोन थर विरळ होत चालेला आहे. ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. पृथ्वीच्या भूपृष्ठापासून सुमारे १० ते १२ कि.मी. पर्यंतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (ट्रोपोस्पिअर) तर १२ ते ५० कि.मी. थर हा स्थितांबर (स्ट्राटोस्पिअर) आहे. ओझोनच्या वातारवणातील एकूण प्रमाणाच्या १० टक्के ओझोन हा तपांबरात तर उरलेला ९० टक्के ओझोन स्थितांबरामध्ये आढळतो.
वातावरणातील स्थितांबराच्या पट्ट्यातील ३० ते ५० कि.मी.भागात ओझोन वायूचा थर पसरलेला आहे. याच थराला ओझोनांबर असे म्हणतात.
निळसर रंगाचा व उग्रवासाचा असणारा ओझोन वायू हे ऑक्सिजनचे एक रूप आहे. क्रिस्टियन फ्रेडरिक स्कोएनबेन यांनी सन १८४० मध्ये ओझोनचा शोध लावला. ग्रीक भाषेतील वास घेणे ह्या अर्थी असलेल्या “ओझेइन” ह्या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे. सन १८६७ मध्ये ओझोनच्या रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन आणू असतात हे त्यांनी सिद्ध केले. स्थितांबरीय ओझोन हा ऑक्सिजनचे रेणू व सूर्यप्रकाशांतील किरणांच्या संयोगातून निर्माण झालेला आहे.वातावरणातील ओझोन हा एकसंध नाही, तो विषुववृत्तीय प्रदेशात कमी तर ध्रुवीय प्रदेशात जास्त आढळतो. हंगामानुसारही तो बदलतो, उन्हाळ्यात जास्त तर हिवाळ्यात कमी असतो.स्थिंतांबरामध्ये ओझोनचे प्रमाण जास्त असून भूपृष्टलगतच्या हवेच्या थरात म्हणजे तपांबरात ओझोनचे प्रमाण मात्र कमी असते.
जैविक पदार्थांच्या दहनातून, तसेच काही वायू आणि प्रदूषकांतील नैसर्गिकरीत्या घडणार्या रासायनिक अभिक्रियांमधून तपांबरातील ओझोन निर्माण होतो. नैसर्गिकरीत्या घडणाऱ्या रासायनिक अभिक्रिंयामधून तपांबरातील तयार होणारा ओझोन विषारी व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यास कारणीभूत असतो, मात्र याचे प्रमाण कमी असते. तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते शेतीच्या उत्पादनास तसेच जंगलांच्या वाढीस मारक ठरू शकते. फुफ्फुसांची क्षमता खालावणे, खोकला, घशाचे विकार वगैरेंसारख्या विविध श्वसनविकारांना आमंत्रण देते. ओझोनच्या विषारी गुणधर्मांमुळे हे श्वसनविकार मृत्यूसही कारणीभूत ठरू शकतात. ओझोन हा हरितगृह वायू असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळेच तपांबरातील ओझोन हा वाईट ओझोन असतो.
स्थिंतांबरामध्येसूर्यापासून येणाऱ्या अपायकारक अतिनील अदृश्य किरणांना ओझोन वायू रोखून ठेवतो व अतिनील किरणांचे शोषण करून सजीवांना उपायोगी असणाऱ्या सूर्य किरणांना भूपृष्ठावर सोडतो. जर अतिनील किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यास ती आपल्यासाठी हानीकारक असतात. त्यांच्यामुळे त्वचेची प्रतिकार शक्ती कमी होऊन त्वचेचा कर्करोग होणे,गुणसूत्रांचे उत्परिवर्तन होणे, पेशीच्या जिवंतपणाचे लक्षण असणार्या प्रथिने आणि केंद्रकाम्लासारख्या सूक्ष्म रेणूंना झळ पोहोचणे, अशासारखे दुष्परिणाम दिसून येतात. वनस्पती पेशींनाही त्यांमुळे झळ पोहोचते. पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन शेतीचे उत्पादन घटते. अन्नसाखळीच्या तळाशी असणार्या जलीय वनस्पतीअतिनील प्रारणांमुळे नष्ट होऊ शकतात. म्हणजे स्थितांबरातील ओझोनचा हा थर नसता तर अतिनील किरणांच्या प्रखर उष्णतेमुळे भूपृष्टावरील सजीवसृष्टी नाहिशी झाली असती. सूर्यप्रकाशातील ९५ ते ९९ टक्के अतिनील घातक किरणे स्थितांबरातील ओझोन शोषून घेतो. ओझोनच्या या गाळण्यामुळे भूपृष्ठावरील सजीवांना अनुकूल एवढीच उष्णता मिळते व हानिकारक अतिनील किरणापासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होते.स्थितांबरातील
ओझोन थरामुळे भूपृष्ठावरील मानव, प्राणी, वनस्पती आणि सजीवांचे सूर्याच्या प्रखर घातक किरणांपासून संरक्षण होते. म्हणूनच ओझोन थराचे पृथ्वीभोवती असणारे हे संरक्षक कवच म्हणजे सजीवांची संजीवनी आहे.
माहिती तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे मानवाने अनेक भौतिक साधनांची निर्मिती केली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शेतातून उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर, हवाई वाहतूक, विविध कारखान्यातून निघणारा विषारी वायू, वाहनामुळे होणारे वायू प्रदूषण आदी मानवनिर्मित प्रदूषकांमुळे ओझोन थराला छिद्रे पडली आहेत. मानवनिर्मित रसायनांमुळे अंटार्टिक स्थितांबरात ओझोनचे प्रमाण खूप कमी होण्याला ओझोन छिद्र असे म्हणतात.
सन १९८५ मध्ये अमेरिकेच्या न्युंबस-७ या उपग्रहाने दक्षिण ध्रुवांवर संयुक्त संस्थानाच्या क्षेत्रफळाएवढे मोठे छिद्र ओझोन थराला पडल्याचे स्पष्ट केले. जे.सी.फार्मन, बी.जी.गर्डिनर आणि जे.डी.शांकलिन यांनी नेचर मासिकात अंटार्टिकावरील ओझोन थराला छिद्र पडल्याची पहिली नोंद केली. सन १९८७ मध्ये हँली बे येथे ओझोन थराला मोठे छिद्र पडल्याचे संशोधकांना आढळून आल्यानंतर ओझोन थराच्या संरक्षणासाठी सर्व देश खडबडून जागे झाले. सजीवांच्या अस्तित्वलाच आव्हान देणाऱ्या ओझोन छिद्राच्या निर्मितीसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या असाव्यात यावर संशोधकांच्यात विचारमंथन सुरु झाले. १६ सप्टेंबर १९८७ साली कँनडातील माँट्रीअल येथे विकसित देशांनी ओझोन थराला हानी पोहचविणाऱ्या घटकांवर निर्बंध घालण्यासाठी “माँट्रीअल करार” करण्यात आला. ओझोन वायूचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक देशाच्या पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत यासाठी १ जानेवारी १९८९ पासून या कराराची अंमलबजावणी सुरु झाली. सन १९९४ मध्ये २९ देशांतील शास्त्रज्ञांनी ओझोन थराची पाहणी करून विरळ होत असल्याचे जाहीर केले. क्लोरीन, नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड, क्लोरोफ्लयुरो कार्बोन (सी.एफ.सी.), फल्युरीन, मेथील ब्रोमाईड, हेलाँन या वायुमार्फत स्थितांबरातील ओझोनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत असते. फ्रीज, वातानुकुलीत यंत्रे, सुक्ष्म इलेक्ट्रॉनिक भागांची स्वच्छता करताना, प्लँस्टिक , संगणक, मोटार, रूम फ्रेशनर्स, रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी क्लोरोफ्लयुरो कार्बोन (सी.एफ.सी.) वायूचा उपयोग केला जातो. मानवनिर्मित क्लोरोफ्लयुरो कार्बोन (सी.एफ.सी) या रासायनिक संयुगामुळे ओझोनच्या थराचा क्षय मोठ्याप्रमाणात होत असतो, हे वैज्ञानिकांनी संशोधनांती सिद्ध केले आहे.
ओझोन थराचा क्षय झाल्याने अतिनील किरणे भूपृष्टापर्यंत मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्यामुळे त्वचेचा कर्करोग, गुंणसूत्राचे उत्परिवर्तन होणे, क्षय, श्वसन विकार, मोतीबिंदू, मालेरीया, पित्त ज्वर, रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम, मानवाची शारीरिक क्षमता कमी होणे, आदी परिणाम मोठ्याप्रमाणात सुरु होतात. समुद्रातील प्राणी, खेकडे यांच्यासहित वनस्पतीवर अतिनील किरणाचा परिणाम होतो. पृथ्वीवरचे तापमान वाढत ध्रुवीय हिमक्षेत्रे वितळून सागरजलाची पातळी वाढेल. पर्यावरणाचा समतोल बिघडून अँसिड पर्जन्यप्रमाण वाढेल, धुक्याचे प्रमाण वाढेल, मातीतील आद्रतेचे प्रमाण कमी होऊन टोमँटो, कोबी, बटाटे, फ्लाँवर आदी भाजीपाल्यावरही अतिनील किरणाचा परिणाम होतो. यामुळे जागतिक तापमान वाढ होऊन नैसर्गिक साधनांचा ऱ्हास होऊन सजीव सृष्टी संपुष्टात येईल.
सजीवांना विघातक ठरणाऱ्या अतिनील किरणांना थोपवून धरणाऱ्या ओझोन वायूचे संरक्षण करणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी वातानुकुलीत यंत्राचा वापर कमीत कमी करणे, रूम फ्रेशनर्स व परफ्युमर्स टाळून नैसर्गिक सुंगंधाचा वापर करणे, फ्रीज मध्ये क्लोरोफ्लयुरो कार्बोन (सी.एफ.सी.) ऐवजी प्रोपेन, ब्युटेन, डायमिथिल इथर, एच.एफ.सी. या वायूचा वापर करून ओझोन क्षयाचे प्रमाण कमी करता येते. पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहचविण्यामध्ये बुद्धिमान मानव प्राणी सहभागी असल्याची जाणीव व्हावी व संपूर्ण जीवसुष्टीचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार १९९५ पासून १६ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीवरील सर्व सजीवांना घातक गोष्टींपासून वाचवणार्या ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत लोकांच्या मध्ये सजगता निर्माण करण्यासाठीचा हा दिवस. ओझोनच्या थराला घातक असणाऱ्या सी.एफ.सी. वायूचा वापर बंद करण्याचा निर्णय विकसित व विकसनशील राष्ट्रांनी घेऊन सन २०५० पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत व्हावा यासाठी सकारत्मक सुरवात केली आहे. ओझोनच्या थराला घातक असणार्या रसायनांचा वापर बंद करण्याच्या बाबतीत हा करार एक मैलाचा दगड ठरला आहे.
१९९१ साली ओझोन थराच्या संरक्षणासाठी भरलेल्या विएन्ना परिषदेमध्ये भारताने ह्या कार्यक्रमास पाठिंबा जाहीर करून १९९२ साली मॉंट्रिएल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.
ओझोन थराच्या संरक्षणासाठी भारताने ही सकारत्मक उपाययोजनेची अंमलबजावणी करून सी.एफ.सी. उत्पादन कमी करण्यात यश प्राप्त झालेबद्द्ल सन २००७ रोजी भारताला “माँट्रीअल प्रोटोकॉल कार्य “ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
अशा ओझोन छिद्राचे क्षेत्रफळ एकूण स्तंभ ओझोनच्या नकाशावरून निश्चित केले जाते. नासा १९७९ सालापासून उपग्रह आणि जमिनीवरून ओझोन वर डोळा ठेवून आहे. त्यांची निरीक्षणे दाखवितात कि, ओझोन छिद्राचे क्षेत्रफळ सर्वात जास्त २००६ रोजी २७ दशलक्ष एवढे होते तर किमान ओझोनचे प्रमाण हे १९९२ साली ९२ डॉब्सन एवढे होते. मागील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये खूपच समाधानकारक निरीक्षणे मिळाली आहेत. मागील वर्षी ओझोन छिद्राचे क्षेत्रफळ ९ दशलक्ष एवढे कमी तर किमान ओझोनचे प्रमाण १९७ डॉब्सन युनिट एवढे जास्त होते.
कोरोना या जागतिक महामारीमुळे लावल्या गेलेल्या टाळेबंदी मुळे वातावरणासाठी खूप फायदा झाला. वातावरणातील खूप प्रमाणात प्रदूषण खाली आलेले दिसले. तपांबरातील ओझोन ही दिल्ली, मुंबई सारख्या महानगरामध्ये कमी झालेला दिसून आला.
आज आपल्याला मंट्रियाल कराराची चांगले परिणाम दिसत आहेत, जर हा करार झाला नसता तर गणितीय मॉडेल असे दाखवितात कि, २०५० पर्यंत ओझोन प्रतीवरून जवळजवळ नष्ट झाला असता. सर्व देशांनी एकत्र येऊन पाळलेला हा करार आणि त्याचे परिमाण खूपच समाधानकारक आहेत. अशाच प्रकारे वातावरणातील इतरही मानवी हस्तक्षेप सर्वांनी एकत्र येऊन कमी करण्याची काळाची गरज आहे.
पृथ्वीवरील जीवसुष्टीच्या अस्तित्वासाठी ओझोन थराचे संरक्षण हेच वास्तव आहे हे मान्य करूनच आपल्याला पुढची वाटचाल करायला हवी. ओझोन थराचा क्षय होणार नाही याची काळजी घेणं शहाणपणाचं ठरणार आहे. सहजसाध्य आणि आपल्या हातात असणारे उपाय अनेक आहेत, सर्वसामान्य नागरिकांनाही याच्याकडे अधिक लक्ष दयाला हवं. ओझोन संरक्षणाविषयीचा प्रसार वैज्ञानिक दृष्टीकोनातून आधिक जागरूकतेने करून जनमाणसात तो रुजलाचं पाहिजे यासाठी पर्यावरणाचे विश्वस्त म्हणून सगळ्यांनीच ओझोन थर संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षणासाठी “साथी हात बढाना” हेच आपल ब्रीद वाक्य मानून विधायक कृती केली पाहिजे.
डॉ.संतोष माने सांगली
Mb.+918421960620