डॉ. आरिफा मुलाणी यांना दैनिक स्वाभिमानी शहर मंगळवेढा यांच्यावतीने स्वर्गीय बी टी पाटील शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते डॉ. आरिफा मुलाणी यांना स्व.बी.टी. पाटील शिक्षक रत्न प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर आरिफा मुलाणी यांचे शिक्षण M.Sc.B.ed.P.hd (जीवशास्त्र) आहे. मदनसिंह मोहिते पाटील सायन्स कॉलेज मंगळवेढा येथे त्यांनी सात वर्षे प्रभारी प्राचार्य पद भूषवले आहे. सध्या त्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर आय. क्यू. ए. सी. समन्वयक म्हणून सुद्धा त्या जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या M.Sc. पर्यावरण शास्त्राच्या समन्वयक म्हणून सुद्धा त्या काम पाहत आहेत. डॉक्टर आरिफा मुलाणी यांनी प्राणिशास्त्र विषयातून एकूण पंधरा शोधनिबंध प्रकाशित केले आहेत व आठ शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद विद्यापीठाचा उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे पर्यावरण व संवर्धन या विषयावरती एक पुस्तक प्रकाशित झाले आहे तसेच त्यांनी 50 हून अधिक चर्चासत्रे व कार्यशाळा केल्या आहेत.