Sanvad News डॉ.स्वाती शिंदे-पवार यांनी नोंदविला विश्वविक्रमांचा विक्रम;जागतिक शांतता दिनी 5 विषयातून साकारले 6 वर्ल्ड रेकॉर्डस्.

डॉ.स्वाती शिंदे-पवार यांनी नोंदविला विश्वविक्रमांचा विक्रम;जागतिक शांतता दिनी 5 विषयातून साकारले 6 वर्ल्ड रेकॉर्डस्.



जागतिक शांतता दिवस आणि अंधश्रद्धा निर्मूलन दिवसाचे औचित्य साधत विटा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ . स्वाती शिंदे- पवार यांनी एकाच दिवशी पाच विषयातून सहा वर्ल्ड रेकॉर्डस् करत विश्वविक्रमांचा विक्रम नोंदविला आहे .खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथे केंद्र मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ .स्वाती शिंदे- पवार या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्त्या व साहित्यिका म्हणून ओळखल्या जातात . गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते आता साकार होत आहे .हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ,मारव्हल्स वर्ल्ड रेकॉर्ड, वॉव वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड , इंडीया रेकॉर्ड  या वर्ल्ड रेकॉर्ड मधून त्यांनी आपल्या नावाची जागतिक पातळीवर नोंद केली आहे . या सर्व नोंदी त्यांनी वेगवेगळ्या सहा विषयातून केल्या आहेत . गेली पंचवीस वर्षे 554 नखे साठवून त्या नखांचे स्लोगन लिहून अंधश्रद्धा निर्मूलनावर मात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.साठवलेल्या नखातून "नखे साठविता गरिबी येते ,अंधश्रद्धा ही दूर करा रे "असे स्लोगन लिहून अंधश्रद्धा निर्मूलन दिनादिवशी त्यांनी आपले वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविले आहे. त्यांनी लिहिलेल्या सर्वात लांब कवितेचे कमीत कमी वेळात वाचन करून त्याची नोंद इंडिया रेकॉर्ड व ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली आहे . त्यांनी मिळविलेल्या ट्रॉफी व प्रशस्तीपत्रांची नोंद मार्बल्स वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे .डॉ. स्वाती शिंदे- पवार यांचे घर म्हणजे जगातील एक बक्षिसांचे दालनच आहे .या घरी 78 राज्य व राष्ट्रीय पुरस्कार आहेत तर प्रमाणपत्रे व शिल्ड यांची संख्या 457 आहे.त्यांनी मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकवीस साहित्य संमेलने घेतली आहेत. अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेली स्त्रीअध्यक्ष, स्त्री प्रमुख पाहुणे, स्त्री स्वागतअध्यक्ष, स्त्री संयोजक ,आणि स्त्रीजन्माचे औचित्य असे साहित्य संमेलन म्हणजे मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून एका आईने घेतलेले हे जगाच्या पाठीवरचे एकमेव साहित्य संमेलन आहे . त्याची नोंद ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे .गेली पंचवीस वर्षे वर्तमानपत्रांतून स्वतःच्या आलेल्या बातम्यांचा त्यांनी कात्रणसंग्रह केला आहे .वॉव वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद घेण्यात आली आहे .ही सर्व वर्ल्ड रेकॉर्ड्स त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून केली आहेत . अक्षरयात्री साहित्यसंमेलनाचे वर्ल्ड रेकॉर्ड हे रामापूर तालुका कडेगाव येथून ,हाय रेंज मध्ये नखांची नोंद घेण्यात आली आहे त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड बानुरगड तालुका खानापूर येथून, सर्वात लांब कविता कमी वेळात म्हणण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड मंगरुळ तालुका खानापूर येथून तसेच ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड मंगरुळ तालुका खानापूर येथून,मार्बल्स वर्ल्ड रेकॉर्ड विटा तालुका खानापूर येथून, वॉव वर्ल्ड रेकॉर्ड जरंडी तालुका तासगाव येथून करण्यात आले आहे . ज्या गावांशी त्यांचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत त्या गावांप्रति या वर्ल्ड रेकॉर्ड मधून त्यांनी आदर व्यक्त केला आहे . एका प्राथमिक शिक्षिकेने स्वतःची शाळा अव्वल स्थानावर ठेवत एक डझन पदव्या घेणे व एकाच वेळी अर्धा डझन वर्ल्ड रेकॉर्ड करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे . एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास हा इतरांना अचंबित करणारा प्रेरणा देणारा व मार्गदर्शक ठरणारा असतो . त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .त्यांच्या या यशात सासर- माहेर दोन्ही परिवारांचा मोठा वाटा आहे . पती श्री . अनिल पवार मुले अक्षरा व शब्दम् यांच्या सहकार्यामुळे मी हे यश मिळवू शकले असे त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले .
To Top