Sanvad News कर्मचारी पदोन्नतीचा प्रश्न येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मार्गी लावू- शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड; कास्ट्राईबच्या शिष्टमंडळाला आश्वासन.

कर्मचारी पदोन्नतीचा प्रश्न येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मार्गी लावू- शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड; कास्ट्राईबच्या शिष्टमंडळाला आश्वासन.



कर्मचारी पदोन्नतीचा प्रश्न येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मार्गी लावू असे आश्वासन कास्ट्राईब च्या कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
राज्‍याचे विविध आस्थापना कार्यालयांमधील मागासवर्गीय कर्मचारी यांचे शासनाकडील दिनांक २९ डिसेंबर २०१७ च्यापत्राप्रमाणे मागासवर्गीय कर्मचारी यांची पदोन्नती थांबवण्यात आली होती तथापि दिनांक 16.12. 2020 रोजी नव्याने नियुक्त झालेल्या राज्याच्या मागासवर्गीय पदोन्नती कमिटीने दिनांक 29 डिसेंबर 2017 चे पत्र रद्द करून शासनाच्या सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांतुन नाराजी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकर होण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा पदोन्नती कमिटी सदस्य वर्षांताई गायकवाड यांची भेट घेऊन पदोन्नतीच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. यावेळी गायकवाड यांनी येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊन तत्काळ सोडवणार असल्याची माहिती दिली.
दिनांक 16. 12. 2020 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट उपसमितीच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार  शासनस्तरावरून व प्रशासनाकडून अद्याप बिंदुनामावली नुसार पदोन्नती बाबत सुधारित पत्र निर्गमित केलेले नाही. दिनांक 18 ऑक्टोंबर 1997 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार बिंदु नामावली प्रमाणे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे बाबत सुधारित पत्र तात्काळ निर्गमित करणेबाबत व दिनांक 29  डिसेंबर 2017 च्या  पत्रानुसार  थांबलेली पदोन्नती  तात्काळ लागू करून  राज्यातील पात्र कर्मचाऱ्याना पदोन्नती देऊन त्यांच्यावरील अन्याय  दूर करावी अशा मागणीचे  निवेदन कास्ट्राईब महासंघाच्यावतीने यापूर्वीच महासचिव नामदेवराव कांबळे  व वरिष्ठ उपाध्यक्ष  गणेश मडावी  यांनी  उपमुख्यमंत्री अजित  पवार  यांना  निवेदन  सादर केले आहे.
तसेच  आज  कोल्हापूर येथे पदोन्नती कमिटीचे सदस्य व शालेय शिक्षणमंत्री  वर्षाताई गायकवाड  यांना समक्ष भेटून    पदोन्नती  बाबत चर्चा केली. यावेळी  वर्षाताई गायकवाड यांनी  येणाऱ्या मंत्रिमंडळात  हा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि प्रलंबित असलेला विषय प्राधान्याने घेऊन  शासन निर्णयाचे सुधारीत पत्र काढून हा विषय निकालात काढू असे आश्वासन त्यांनी  यावेळी शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात महासचिव नामदेवराव कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी, उपाध्यक्ष सुशील कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे, अशोक दाभाडे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गौतम वर्धन, बाबासाहेब कागलकर, सुधाकर कांबळे, नंदू चौगुले, संजय कुर्डूकर, बाबासाहेब कागलकर, पी. डी सरदेसाई, जी. के. कांबळे, सहदेव कांबळे, डी एस कौसल, आदी सहभागी झाले होते.
To Top