स्वतःची मातृभाषा ही जीवनमात्राची प्रतिष्ठा असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी केले.विटायेथील सौ.विजयमाला पतंगराव कदम सार्वजनिक वाचनालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' व 'नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली कोळेकर होत्या.
यापुढे बोलताना,रघुराज मेटकरी म्हणाले की,प्रत्येकाला मातृभाषा येणे हा सन्मान आहे.जीवनमात्राची प्रतिष्ठा मातृभाषेत असते. मनाची रमणीयता आणि पवित्रता ही मातृभाषेत असते. मातृभाषेतून केलेले वाचन, चिंतन, माणसाला अधिक शिस्तप्रिय आणि सुंदरता देते. वाचनालयाने अनेक मराठी मनाची सेवा केलेली आहे. वाचनालय हे सुगंधी विचाराचे आगर आहे.
वाचन संस्कृतीचने जीवनाची दिशा बदलते. मराठी भाषा संस्कारी श्रेष्ठ भाषा आहे. ती ज्ञानेशासह शेकडो संतांच्या वाणीने अमृतमय बनली आहे. मातृभाषा ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य व संगीत यांचे खजिने वाचकांना भेट देते.प्रासादिकता हा मातृभाषेचा स्थायीभाव असतो. "भाषेची समृद्धी ही समृद्ध जीवनाची वाटचाल असते". असे विचार साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी मांडले.
योगेश्वर मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. राजू गारोळे,शंकर कांबळे,अध्यक्षा वैशाली कोळेकर यांनी आपले विचार मांडले. चंदना तामखडे यांनी आभार मानले.