पत्रकार साहित्यिकांनी दुष्टप्रवृत्तीवर आसूड ओढण्यासाठी व समाजाच्या सार्वत्रिक हिताच्या विधायक बाबींसाठी लेखणीचे शस्त्र करावे, ते शास्त्र म्हणून पुढील पिढीला मार्गदर्शन व्हावे असे मत दयासागर बन्ने यांनी व्यक्त केले.
अग्रणी प्रतिष्ठान व अभिव्यक्ती प्रतिष्ठान देशिंग हरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 'पत्रकारिता आणि साहित्य' या विषयावर पत्रकार दिनानिमित्त गुगल मिटवर ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कवी श्री बन्ने बोलत होते.जिल्ह्यातील पत्रकार व साहित्यिक सहभागी झाले.
समारोप व्याख्यानात कवी दयासागर बन्ने यांनी दिले. ते पुढे म्हणाले,की पत्रकारिता आणि साहित्य यांचा दुवा शब्द आहेत.या शब्दांची साधना पत्रकारांनी व साहित्यिकांनी केले पाहिजे. बातम्या लेखकाला विषय पुरवत असतात तर साहित्य पत्रकाराला लेखणी साठी समृद्ध बनवत असते. सामान्य माणसाचा आवाज, अन्याया विरुद्धची चीड, व्यवस्था बदलण्यासाठी मनात निर्माण करायचा विद्रोह, सत्यासाठी धडपड, सत्येवर अंकुश आणि सामान्य माणसाच्यामतांचे प्रगटीकरण पत्रकारितेतून आणि साहित्यातून होत असते. मूक मनावरची खपली काढून अस्मिता लखलखीत ठेवण्याकरता दोघांची लेखणी झिजत असते. साहित्यिकांच्या स्मारकांसाठी झटणाऱ्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी व निवासस्थानांसाठीही एकजुटीने त्यांच्या पाठीशी राहावे.
यावेळी समाधान पोरे म्हणाले, साहित्य आणि पत्रकारिता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बातमीतून साहित्य डोकावते. साहित्यात बातम्या सूचकतेने असतात. बातमीतून साहित्य प्रवाहित होते. नामदेव भोसले म्हणाले, नव्या नव्या माध्यमांतून विधायक पत्रकारिता आकारास येत आहे.राजकुमार चौगुले म्हणाले, पत्रकारिता आव्हानात्मक आहे. पत्रकारांनाही समजून घ्यावे. कृषी पत्रकारितेकडे महत्वाचे साधन म्हणून माध्यमांनी पहावे. तर अजित कुलकर्णी म्हणाले, साहित्यिकांइतकेच पत्रकारांनाही लेखनाचे स्वातंत्र्य मिळाले तर ते साहित्यिकच होतात.पत्रकार दिनी साहित्यिकांनी असा कार्यक्रम घडवून पत्रकारांचा सन्मान केला आहे,हे आनंददायी आहे.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले, पत्रकारांच्या लेखणीने सत्ता बदलू शकते. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सहित्यकांचे प्रश्न सुटू शकतात. असे विषय लावून धरण्याचे काम पत्रकारच करू शकतात.
प्रा.संजय ठिगळे म्हणाले,वृत्तपत्रातून सकस वाचन होते. प्रत्येकाच्या आवडीनुसार वृत्तपत्रांनी विकासाभिमुख पत्रकारितेला प्राधान्य दिले आहे ही बाब स्वागतार्ह आहे. गौतम कांबळे म्हणाले ,पत्रकार हा सामाजिक कार्यकर्ता असतो. अनेक धोके आणि शत्रू असले तरी समाजाप्रती त्यांची बांधीलकी असते. वृत्तपत्र म्हणजे जिवंत संवाद होय. रघुवीर अथणीकर म्हणाले, नावाशिवायही पत्रकाराची शब्दकळा कळते तेव्हा तो पत्रकार मोठा असतो. विद्यासागर बन्ने म्हणाले,मथळ्यापुरते वाचणारे वाचक नकोत, पूर्ण कॉलम बातम्या वाचणाऱ्या सूज्ञ वाचकांना साहित्यिकांनी घडवावे. महादेव हवालदार म्हणाले, सर्वकालीन भाष्य पत्रकारितेत असते .पत्रकार- साहित्यिक समाजाचे आदर्श आहेत. सौ सुरेखा कांबळे म्हणाल्या, साहित्यात व पत्रकारितेत वाचनीयता महत्त्वाची आहे. दोन्हीत अचूकतेला महत्त्व आहे.
स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन कवयित्री सौ.मनीषा पाटील यांनी केले.आभार मंदीप माने, पृथ्वीराज पाटील यांनी मानले. या ऑनलाईन कार्यक्रमास अनेक साहित्यिक पत्रकार व वाचक उपस्थित होते.