कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम सुरू करा अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. एकूण 58 शाळांमध्ये फक्त 10,923 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचा पट खालावत चालला आहे. इतर खासगी शाळांच्या स्पर्धेला उतरण्यास महापालकेच्या शाळा अपयशी ठरत आहेत. या शाळांचा पट वाढावा आणि त्या शाळा पुन्हा एकदा उभ्या राहाव्यात यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आपल्याला खालील मागण्या व सूचना करण्यात आल्या आहेत.
शाळांची डागडुजी करण्यासाठी महापालिकेला निर्देश व्हावेत.विद्यार्थ्यांसाठी खेळणी, गोष्टींची पुस्तके व वाचन साहित्य पुरविण्यात यावे.पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने, टप्प्या-टप्याने या शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे.महापालिका शाळांमध्ये एक परदेशी भाषा शिकवण्यात यावी जेणेकरून येथील विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ होऊन ते भविष्यात चांगल्या संधी मिळवू शकतील.
महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची पदे त्वरित भरण्यात यावीत. तसेच मुलांमधे संगीत, गायन, मर्दनी खेळ या सारख्या गोष्टिंमध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी स्पैशल कोच नेमावेत.कोल्हापूर महापालिकेतील शिक्षणाधिकारी पद कायमस्वरूपी भरण्यात यावे.महापालिकेच्या शाळांची देखभाल करण्यासाठी प्रत्येक शाळेवर एक इस्टेट ऑफिसर नेमण्यात यावा.
महापालिकेच्या शाळेत आनंददायी अभ्यासक्रम ( Happiness Curriculum) सुरू करण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना आनंदी राहण्याचे शिक्षण मिळू शकेल.वरील सूचनांची तसेच मागण्यांची त्वरित दखल घेऊन कार्यवाही व्हावी व संबंधित विभागांना निर्देश व्हावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी कोल्हापुर महापालिका प्रचार समिती अध्यक्ष संदिप देसाई,शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटक सुरज सुर्वे,महिला शहर अध्यक्ष अमरजा पाटील,विभाग प्रमुख विशाल वठारे,बसवराज हादिमनी आदींसह पदाधिकारी उपस्थीत होते.