Sanvad News प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा- शिक्षक संघाची मागणी;तासगाव पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी वर्गांसोबत चर्चा

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा- शिक्षक संघाची मागणी;तासगाव पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी वर्गांसोबत चर्चा


तासगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तासगाव शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच पंचायत समितीच्या सभापती मा. कमलताई पाटील, उपसभापती डॉ. शुभांगी पाटील, गटशिक्षणाधिकारी मा. अनुराधा मेत्रे यांची भेट घेतली. यावेळी पुढील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषदेकडून मराठी हिंदी सुट, परिविक्षाधीन कालावधी मंजुरी, कायम पणाचे आदेश तसेच नावात बदल इत्यादी मंजूर होऊन आलेल्या आदेशांची संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात यावी. त्यामुळे भविष्यामध्ये सदरची यादी शोधण्याची वेळ कर्मचाऱ्यावर येणार नाही.अपघात विमा रक्कम कपातीची नोंद तात्काळ सेवा पुस्तिकेत घेण्यात यावी.
प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय तसेच वेतन फरकांची बीले प्रलंबित असून त्यासाठी निधीची मागणी जिल्हा परिषदेकडे तात्काळ करावी.


पंचायत समिती कार्यालयाकडे प्राप्त झालेले वरिष्ठ वेतन श्रेणी (चटोपाध्याय) प्रस्ताव, सेवा निवृत्ती धारकांचे पेन्शन प्रस्ताव, भविष्य निर्वाह निधी तील कर्ज प्रकरणे, कायम पणा, मराठी हिंदी सूट, परिविक्षाधीन मंजुरीचे प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेकडे पाठवले जावेत. या सर्व प्रश्नां बाबत पदाधिकारी व अधिकारी यांच्याबरोबर शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने सकारात्मक चर्चा केली.

यावेळी पंचायत समितीचे लेखाधिकारी श्री. चेतन आवटे, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव, नगरपालिका नेते श्रीकांत पवार, तालुका नेते नंदकुमार खराडे, तालुकाध्यक्ष शब्बीर तांबोळी, सरचिटणीस राजाराम कदम, रणजीत नाटेकर, मंगेश गुरव, आनंदा उतळे,रविंद्र शिंदे, मारुती मोरडे,संदीप खंडागळे, कुमार माळी यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

To Top