आधुनिकीकरणाच्या काळात मातृभाषेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.उच्चशिक्षित तरुणांनी मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहावे,असे प्रतिपादन हास्ययात्रा या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते शरद जाधव यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.डी.कदम होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.पतंगराव कदम,कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले की, जीवनातील खरा आनंद शोधण्यासाठी माणसाने स्वतःला मातृभाषेबरोबर जोडून घेतले पाहिजे. भाषेतील छोट्यामोठ्या गमतीजमतीतूनच माणसाला सात्त्विक आनंद मिळू शकतो.येणाऱ्या काळामध्ये मातृभाषेमध्ये नवे रोजगार, नवे ज्ञान निर्माण करण्याची त्या-त्या निजभाषकांची जबाबदारी आहे.
यावेळी त्यांनी एकपात्री विनोदी कार्यक्रम 'हास्ययात्रा'चे सादरीकरण करून विद्यार्थ्यांचे निखळ मनोरंजन केले.त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
प्राचार्य डॉ. एल.डी.कदम यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेची महती आणि मातृभाषेच्या संरक्षणाविषयीचे आपले विचार मांडले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. व्ही.बी.पाटील, डॉ. काकासाहेब भोसले, लेखक संदिप नाझरे आदी मान्यवरासह महाविद्यालयातील सेवक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. तेजस चव्हाण, आभार मराठी विभागप्रमुख दिलीप कोने यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. स्वाती मगदूम यांनी केले.