इंग्रजांशी सतत चौदावर्षे प्राणपणाने लढा देणारे व स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पर्वात हसत हसत फासावर गेलेले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचाइतिहास हा तरुणांना प्रेरणादायी असूनही तो दुर्लक्षित राहिल्याची खंत प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष मारुती शिरतोडे यांनी रामानंदनगर तालुका पलूस येथे व्यक्त केली.
समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतीशील विचार मंच पलुस, श्री समर्थ साहित्य,कला,क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ पलुस व व्ही.वाय.(आबा) पाटील समाज प्रबोधन अँकॅडमी नागराळे यांचे संयुक्त विद्दमाने आयोजित आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना 'आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जीवन व कार्य'या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी क्रांतीअग्रणी पर्व चे संपादक भाई व्ही.वाय.(आबा)पाटील होते.
यापुढे बोलताना मारुती शिरतोडे म्हणाले की मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर स्वातंत्र्यलढा सुरू झाला. या स्वातंत्र्यलढ्याचे चार टप्पे पडतात.1818 पासून 1857 पर्यंत पहिला टप्पा,1858 ते 1885 पर्यंतचा दुसरा टप्पा, 1886 ते1920 पर्यंतचा तिसरा टप्पा आणि 1921 ते 1947 पर्यंतचा चौथा टप्पा. या चार टप्प्यातील पहिल्या पर्वात उमाजी नाईक या रामोशी वीराने रामोशी तरुणांना गोळा करून ब्रिटिशांच्या कंपनी सरकारला सळो की पळो करुन सोडले. ब्रिटीश सैनिकांच्या पलटणी उमाजीला पकडण्यासाठी जिवाचं रान करीत होत्या परंतु डोंगरदऱ्यात लपून-छपून गनिमीकाव्याने इंग्रजांशी उमाजीने प्रखर बंड उभारले. या चौदा वर्षात इंग्रजांचे खजिने लुटणे,पोलीस चौक्या जाळणे याबरोबरच अनेक धाडसी कृत्ये करून इंग्रजांना, इंग्रजांच्या हस्तक असणाऱ्या धनिकांना, सावकारांना, जाहगीरदारांना उमाजीने अद्दल घडवली व गोरगरीबांना मदत केली.
न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. मुंबई ईलाख्यातील पुणे प्रांत, सातारा प्रांत, नगर प्रांत, कोकण प्रांत,अशा अनेक भागात स्वतःचे राज्य निर्माण करणारा उमाजी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणारा राजाच होता. उमाजी राजाने जाहीरनामा प्रसिद्ध करुन इंग्रज सरकार उलथून पाडण्याचे आवाहन भारतीय जनतेला केले होते.उमाजी राजाला पकडून देणाऱ्यास आजपासून दोनशे वर्षापूर्वीच्या कालखंडात ब्रिटिशांनी दहा हजार रुपये रोख आणि चारशे बिघे जमीन एवढे मोठे बक्षिस जाहीर केले होते. या आमिषाला बळी पडून दोन इसमांनी उमाजीला फितुरीने 16 डिसेंबर 1831 रोजी भोर नजीक उत्रोळी येथे पकडून देण्यास मदत केली. उमाजीला पकडण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी लॉर्ड माँकिटाँशने लिहिलेल्या उमाजींच्या चरित्रात म्हटले आहे की "काळ अनुकूल असता तर उमाजीराजे दुसरे छत्रपती शिवाजी महाराज ठरले असते"अशा या भारतातील आद्य क्रांतीवीराला 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्यातील मामलेदार कचेरी समोर खडकमाळ येथे फाशी देण्यात आले.उमाजी नाईकांचा इतिहास प्रेरणादायी असून तो आजही दुर्लक्षित असल्याची खंत यावेळी मारुती शिरतोडे यांनी व्यक्त केली.आद्यक्रांतीकारक उमाजी नाईकांच्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साडेतीन लाख हुतात्मे झाले आहेत. अनेकांनी कारावास भोगला आहे. बलिदान दिले आहे. त्यांच्या प्राण त्यागावरच आपल्या देशाचे स्वातंत्र्य आज उभे आहे. तेव्हा हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सजग राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. आदम पठाण यांनी केले तर आभार प्रा.विठ्ठल सदामते यांनी मानले. व्याख्यानमालेस हिम्मतराव मलमे,दगडू जाधव, संदिप सदामते,सुनील दलवाई ,भानुदास आंबी,उत्तम सदामते,मारुती सावंत, बाळासाहेब खेडकर ,जयवंत मोहिते ,संजय जाधव, महेश मदने, कृष्णत गायकवाड, संजीवनी मोहिते, म.मा.फाटक,बी.बी.खोत सह अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.