सांगली: वैश्विक महामारी बनलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्रात बदल झाले आहेत त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद राहिले नाही. विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्व क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहेत. राष्ट्राची प्रगती ही राष्ट्राच्या शैक्षणिक बाबीवर अवलंबून असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदलणारी शिक्षणाची पद्धत स्विकारण्यासाठी सर्वांनी अद्यावत असले पाहिजे. तंत्रज्ञानातील प्रगतीच देशाला सामर्थ्यवान बनविण्यासाठी उपयोगी पडते. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी ज्ञान, कौशल्य बरोबर नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाची कास धरावी लागेल. म्हणून देशाला सामर्थ्यवान बनविण्यासाठी व समाज उन्नतीकरिता
नवनिर्मितीसाठी सज्ज होण्याची गरजअसल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षातर्फे मूलभूत व उपयोजित विज्ञानातील नव विचारप्रवाह या विषयावरील आभासी माध्यमातून आयोजित राष्ट्रीय संशोधन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे,डॉ. भालचंद्र काकडे(चेन्नई), डॉ. शांतकुमार मन्ने, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. व्ही. आय. कलमाडे, परिषदेच्या संयोजिका डॉ. सौ.प्रभा पाटील, प्रा. टी. आर. सावंत, परिषदेचे समन्वयक डॉ.अमित सुफले, आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी पुढे बोलताना डॉ. नितीन करमळकर
म्हणाले वैदिक विज्ञान तसेच आंतरविद्याशाखीय शिक्षणाची मूळ संकल्पना प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत निर्माण झाली असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे बदलणाऱ्या शिक्षण प्रवाहात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात आल्याने तंत्रशिक्षण ही भविष्यातील शिक्षणातील महत्त्वाची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रातील येऊ पाहणाऱ्या या बदलाचे शिक्षकांनी साक्षीदार व्हावे व विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी नवतंत्रचा समावेश करावा असे आवाहन करीत डॉ. नितीन करमळकर यांनी वैद्यकीय,विज्ञान, अभियांत्रिकी, कौशल्य व व्यावसायिक शिक्षणाच्या समन्वयातूनच समाजाची पर्यायाने राष्ट्राची प्रगती शक्य असल्याने शिक्षणाचा व संशोधनाचा संबंध जोडून समाजातील विविध प्रश्न सोडवले पाहिजेत असे यावेळी सांगितले.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठात परीक्षा संदर्भातील विविध समितीच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांनी कौतुकास्पद कार्य केल्याबद्दलची
प्रशंसा डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी केली .
या राष्ट्रीय संशोधन परिषदेत प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना परिषदेच्या माध्यामातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाविषयी आवड निर्माण करणे व नव निर्मितीविषयी प्रोत्साहन देण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे नमूद करीत भारती विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. पतंगराव कदम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित करीत डॉ. डी.जी.कणसे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या वतीने विविध समाज उपयोगी विषयावरील १० वेबिनार, ७ अभ्यासक्रमाबद्दलच्या कार्यशाळा, शिक्षक प्रशिक्षण आदी कार्यक्रम ऑनलाइन शिक्षणासहित घेतल्याचे यावेळी नमूद केले.
षरिषदेच्या संयोजक व विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील यांनी परिषदेचे धेय्य व स्वरुप विषद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सौ.भारती भावीकट्टीयांनी केले तर उपस्थितांचे आभार परिषदेचे समन्वयक डॉ.अमित सुफले यांनी मानले. , डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, परिषदेचे सचिव प्रा. डॉ. व्ही. बी. आवळे, डॉ. संतोष माने, प्रा. अमोल वंडे यांच्या सहित विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी तसेच कदम महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक,पदाधिकारी, शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी आदी आभासी माध्यमातून उपस्थित होते.