नदीचे प्रदुषण कमी करणे, शेतातील तण नष्ट करणे या साठी काही पक्षी सतत काम करत असतात. या मुळे पक्षी पर्यावरणाचे रक्षक आहेत. शेतकऱ्यांचे मित्र आहेत. पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, त्यांच्या घरट्यांचे - पिल्लांचे रक्षण करणे. जखमी पक्ष्यांना मदत करणे हे आपले माणूस म्हणून कर्तव्य आहे. पक्ष्यांबद्दल कोणतीही अंधश्रध्दा बाळगू नका. असे मत प्रसिद्ध लेखक व पक्षीमित्र संदीप नाझरे यांनी व्यक्त केले.
पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आमणापूर येथे संदीप नाझरे यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यांबद्दल विविध महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. स्थानिक पक्षी, पाहुणे पक्षी, शेतात राहणारे, नदीकाठचे पक्षी, पर्यावरणाचे मित्र पक्षी, देश विदेशातून येणारे पक्षी अशी विविध माहिती विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करणारी होती.
पक्षी, त्यांचे प्रकार, त्यांचे खाद्य, वास्तव्य या बाबत माहिती सांगताना नाझरे यांनी विद्यार्थ्यांना चर्चेत सहभागी करुन घेतले. बगळा, गाय बगळा, राखाडी बगळा, जांभळा बगळा, गरुड, गिधाड, घार, खंड्या पक्षी, दयाळ, टिटवी, नर्तक, चातक, साळूंखी, रामगंगा, कोतवाल, सुगरण, कंकर, आवाक, धोबी पक्षी, चक्रवाक, बदक, माळढोक, हरीयाल, मोर, शेकाट्या, वेडा राघू, राजहंस, सुतार पक्षी अशा शेकडो पक्ष्यांबद्दल नवीन माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.पलूस तालुक्यातील आमणापूर, बंचाप्पा बन, कोंडार, हजारवाडी या परिसरातीलही अनेक पक्ष्यांची माहिती नाझरे यांनी सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश खारकांडे केले तर आभार कविता कांबळे यांनी मानले. या वेळी मनिषा रावळ, ज्योती पाटील, आसिफा नदाफ, सुनिता करपे, सारिका गंभीर उपस्थित होते.