शिक्षक बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कायम ठेव परत देण्याचा घाट घातलेला असून सभासदांची सहानुभूती मिळवण्यासाठी केला जाणारा हा केविलवाणा प्रयत्न असून कायम ठेवीला जादा व्याजदर द्यावा लागत असल्याने सत्ताधारी संचालक मंडळाने हा निर्णय घेण्याचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला असून तो निर्णय न घेता शेअर्स रक्कमेवर तुटपुंजा डिव्हिडंड देण्यात येत आहे त्यामुळे सभासदांचे लाखो रुपये शेअर स्वरूपात बँकेकडे पडून राहत असल्याने सत्ताधारी संचालक मंडळाने पन्नास हजार पर्यंत शेअर्स रक्कम ब्लॉक करून उर्वरित रक्कम सभासदांना परत करावी अशी मागणी तासगाव तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष शब्बीर तांबोळी यांनी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत केली.
नुकतीच आपल्या शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे . एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आजपर्यँत सभासदांनी कधीही कायम ठेव परतीची मागणी केलेली नाही. कारण कायम ठेवीवर बऱ्यापैकी व्याज मिळते. सभासद सातत्याने लाभांशाची मागणी करत आहे. सभासदांचे शेअर्स च्या रूपाने हजारो रुपये अडकून आहेत. या रकमेवर लाभांश ( डिव्हिडंड ) रूपाने काहीही परतावा मिळत नाही. असे असताना शेअर्स रकमेवर डिव्हिडंड न देता कायम ठेव परत करणे म्हणजे सभासदांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे लक्षण आहे.आमचे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी हिम्मत असेल तर दोन अंकी डिव्हिडंड द्या अथवा शेअर्स ची रक्कम परत द्यावी.
ज्या रकमेवर व्याजाच्या रूपाने बऱ्यापैकी परतावा मिळतो ती कायम ठेव परत करणे आणि ज्या शेअर्स च्या रकमेवर डिव्हिडंड रूपाने कधी अत्यल्प तर कधी अजिबात परतावा मिळत नाही,असे असताना कायम ठेव परत करणे म्हणजेच सभासद बंधू-भगिनी यांच्या डोळ्यात धुळफेक करणेचा उद्योग बंद करून शेअर्स रक्कम परत करावी अन्यथा शिक्षक संघ कायम ठेव परत करण्याच्या निर्णयाला तिव्र विरोध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही , असे तालुकाध्यक्ष शब्बीर तांबोळी यांनी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना सत्ताधारी संचालक मंडळाने गेली अकरा वर्षे सत्ता भोगून देखील सभासद अहिताचा कारभार केला आहे.त्यामुळे सभासदांच्या प्रचंड नाराजी आहे,त्यामुळे सभासद यावेळी निश्चितच परिवर्तन करतील सत्ताधार्यांना घरी बसवतील असा विश्वास व्यक्त केला.तसेच संगणक दुरुस्तीवर अमाप खर्च,शाखा इमारत खरेदीवर वारेमाप खर्च, अनावश्यक नोकरभरती, कर्मचारी बोनस व बक्षीस पगार वाटप अशा विविध बाबींवर केलेला वारेमाप खर्च यामुळे सभासद बंधू-भगिनी यांना कमी व्याजदराने कर्ज देण्यात अपयशी ठरले आहेत, यामुळे सभासद बंधू-भगिनी यांना भरमसाठ व्याज दराने कर्ज घेऊन ते फेडण्यातच त्यांचा पगार खर्ची पडत आहे.त्यामळे सभासद बंधू-भगिनी यांची सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रचंड नाराजी असल्याने परिवर्तन अटळ आहे असे शब्बीर तांबोळी यांनी सांगितले.
यावेळी अविनाश गुरव , श्रीकांत पवार, नंदकुमार खराडे,रघूनाथ थोरात, अण्णासाहेब गायकवाड, राजाराम कदम, उत्तम पाटील,आनंदा उतळे, संदिप खंडागळे, संदिप पाटील, जगन्नाथ घोडके,संभाजी पाटील ,मारूती मोरडे , मलकुद्दीन मुल्ला, सुधीर नलवडे,संजय शिंदे, पंडित पाटील, इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.