सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीकडून आज सध्या कोरोना महामारी च्या काळात जिल्ह्यात सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांच्या विविध मागण्यांचे पत्र मा.जिल्हाधिकारी सांगली, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली ,मा.शिक्षणाधिकारी व आयुक्त,सांगली मिरज कुपवाड महापालिका यांच्याकडे सादर. करण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की covid-19 बाबत अधिग्रहीत केलेल्या कामांचे आदेश व जॉब चार्ट सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे मिळावेत. जिल्ह्यातील शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी covid-19 च्या कामासाठी कर्तव्य बजावत असताना संबंधित शिक्षकास कोव्हिडची बाधा झाली तर संबंधितास प्राधान्य क्रमाने जिल्हा प्रशासनाने बेड उपलब्ध करुन देण्यात यावे. यासाठी जिल्हास्तरावर शहरी व ग्रामीण विभागासाठी स्वतंत्र जिल्हा समन्वयकाची नियुक्ती करावी. covid-19 कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 100% लसीकरण प्राधान्याने करणेत यावे. covid-19 बाबत कामांचे आदेश देताना सर्व आस्थापना मधील कर्मचाऱ्यांचा सहभाग घेण्यात यावा.आपत्ती निवारण कामातील सर्व आस्थापना यांचा सहभाग या कोरोना महामारी च्या काळात वाढवावा आणि वारंवार एकाच कर्मचाऱ्यास आदेश देण्याचे धोरण बदलणेत यावे. covid-19 चे कर्तव्य बजावताना संबंधित कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह होऊन दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाच्या वारसांना सर्व शासकीय लाभ तातडीने देण्याबाबत खातेप्रमुख यांचेवर कार्यवाही करण्याची जबाबदारी देण्यात यावी.
शिक्षण सेवक,गर्भवती महिला, स्तनदा माता ,गंभीर आजार व वय वर्षे 53 असणारे कर्मचारी आणि विनाअनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना covid-19 या कामातून वगळण्यात यावे. covid-19 चे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा व सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे. आणि शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने covid-19 च्या कामात सहभागी असतानाही प्रशासन व शासन स्तरावरून याबाबतची माहिती जनमानसात पोहोचवली जात नाही याबाबत उचित कार्यवाही करावी.आदी मागण्यांचा समावेश आहे.
सदर मागण्यांचे निवेदन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज विविध विभागांना देण्यात आले. यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे सदस्य मारुती शिरतोडे ,सुनिल गुरव, अमोल माने, राहुल पाटणे, संतोष कदम,विष्णूपंत रोकडे, विकास वायदंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.