सांगली: माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली व सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघ,सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेतू-अभ्यास' ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलं . यासाठी प्रमुख मार्गदर्शक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ,पुणे याच्या मराठी विषय सहाय्यक डॉ. नंदा भोर व सेतू-अभ्यास समिती सदस्य माननीय विजय सरगर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख उपस्थिती मा. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे हे होते. स्वागत विठ्ठल मोहिते यांनी केले .
याप्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी म्हणाले की, "मातृभाषा मराठीसाठी मराठी अध्यापक संघाचे सातत्याने चाललेले प्रयत्न अत्यंत चांगले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्व भाषिक क्षमतांचा विकास साधण्यास व या अभ्यासक्रमाची यशस्विता वाढवण्यासाठी या मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होईल. शिक्षकांनी उत्तमप्रकारे ही प्रक्रिया यशस्वी करावी." याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी बोलताना म्हणाले की ,"योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन, शिक्षकांपर्यंत हे 'सेतू-अभ्यास' मार्गदर्शन योग्य प्रकारे पोहोचते आहे; ही बाब कौतुकास्पद आहे .ज्यांनी सेतू-अभ्यास प्रक्रियेमध्ये स्वतः काम केलेले आहे, त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन शिक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने नेमकेपणा येईल. ही बाब उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाची ठरू शकते."
मार्गदर्शन करताना डॉ.सौ नंदा भोर म्हणाल्या की, "हा अभ्यास कल्पनादृष्टीत आहे. पाठ्यपुस्तकांना स्पर्श न करता या अभ्यासाची निर्मिती करण्यात आली आहे. यामधून विद्यार्थ्यांना अधिक अभिव्यक्त होता यावं, आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्याचबरोबर मौखिक भाषा विकास साधला जावा आणि वाचन-लेखन कौशल्यही विकसित करण्यास मदत करणारा ठरावा असा हा अभ्यास आहे."
मार्गदर्शक विजय सरगर म्हणाले, "कोरोना कालखंडामध्ये जो विद्यार्थ्यांचा 'लर्निंग लाॅस' अर्थात 'शैक्षणिक नुकसान' जे झाले आहे, ते भरून काढण्याचं काम सेतू-अभ्यासाच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये- 'जाणून घेऊ या,' 'सक्षम बनू या,' 'सराव करू या,' 'कल्पक होऊ या' अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या कृती आहेत. हा अभ्यास अभिव्यक्त होण्याला प्रेरणा देतो.क्रियाशीलता वाढवतो. आत्मविश्वास वाढवतो. आनंद निर्माण करतो. असा हा अभ्यासक्रम निश्चितच विद्यार्थ्यांना लाभदायी ठरेल.
प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय सौ.वैशाली आडमुठे यांनी करून दिला. आभार जिजाराम पोटे यांनी मानले. संयोजन नाना पवार, बजरंग संकपाळ,रमेश पाटील यांनी कले.