Sanvad News शिक्षक बँकेच्या सभासदांची सत्ताधाऱ्यांकडून फसवणूक -शिक्षकसंघाचे नेते अरुण पाटील यांचा आरोप

शिक्षक बँकेच्या सभासदांची सत्ताधाऱ्यांकडून फसवणूक -शिक्षकसंघाचे नेते अरुण पाटील यांचा आरोप



सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन यांनी सभासदांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेले आहे. शिक्षक बँकेच्या सभासदांना लाभांश देताना हात नेहमीच अखडता घेणाऱ्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांवर मात्र ६५ लाख इतकी बक्षीस पगारावर उधळपट्टी केलेली आहे. कोरोना कालखंडामध्ये लाभांश वाटपासाठी रिझर्व बँकेचे बंधन आहे असे सांगणार्‍या चेअरमन यांची कर्मचाऱ्यांवर बक्षिसांची खरात करताना नैतिकता कुठे गेली होती असा सवाल शिक्षक संघाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे नेते अरुण पाटील यांनी केला.

तासगाव येथे झालेल्या शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधाऱ्यांना सभासदांच्या आणि शिक्षक संघाच्या प्रखर विरोधामुळे सभासद विरोधी अनेक ठराव मागे घ्यायला लागले इतकी नामुष्की होऊन सुद्धा गिरे तो भी टांग उपर या स्वभावाचे असणारे अध्यक्ष यांनी सभासदांना फसवण्याचे घोर पाप केलेले आहे. एकीकडे कोल्हापूर शिक्षक बँक १४% तर सातारा शिक्षक बँक ९% इतका उच्चांकी डिव्हिडंड लाभांश देत असताना आपले चेअरमन मात्र ६.५% इतका लाभांश देऊन स्वतःचे उर बडवून घेण्यात मग्न आहेत.

यावेळी सरचिटणीस अविनाश गुरव म्हणाले सत्ताधाऱ्यांनी संगणक दुरुस्ती, इमारत खरेदी व दुरुस्ती, इतर खर्च, किरकोळ खर्च यामध्ये वारेमाप उधळपट्टी केलेली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिक्षक बँकेच्या सभासदांमध्ये असणाऱ्या प्रचंड दोषामुळे यांना फिरता सुद्धा येणार नाही. सभासदांच्या आणि शिक्षक संघाच्या पाठिंब्यावर सत्ता पर परिवर्तन अटळ आहे.
यावेळी श्रीकांत पवार,शब्बीर तांबोळी, रघुनाथ थोरात, नंदकुमार खराडे, राजाराम कदम, आनंदा उतळे, संदीप खंडागळे, अण्णासाहेब गायकवाड, संजय शिंदे, सुधीर नलवडे यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
To Top