Sanvad News शाळांचा राष्ट्रीयकृत बँक खाते बदल थांबवा-बाबासाहेब लाड;लसीकरण,काँल सेंटर आदेशही रद्द करण्याची मागणी.

शाळांचा राष्ट्रीयकृत बँक खाते बदल थांबवा-बाबासाहेब लाड;लसीकरण,काँल सेंटर आदेशही रद्द करण्याची मागणी.

 

समग्र शिक्षा अभियानांतर्गत सध्या शाळांची राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाती सुरु असून ती दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेत  उघडण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये. तसेच प्रत्यक्ष शाळा सुरु असल्याने लसीकरणासह कोविड कामकाजावरील शिक्षकांचे सर्व आदेश रद्द करण्यात यावेत अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडे केली. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सदस्य बाबासाहेब लाड, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश नरुटे, सरचिटणीस प्रकाश कलादगी, विकास चौगुले,दिलीप पाटील, शंकर भोसले यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेब यांच्या सोबत शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा केली. 
         समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांची  राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाती सुरु आहेत ती बंद करुन बँक आँफ महाराष्ट्र शाखेत उघडण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या दि.२२ जून २०२१  परिपत्रकानुसार जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र बँकेत नव्याने शाळांची खाती उघण्यासाठी सूचना दिल्याने मुख्याध्यापकांना नाहक त्रास होत आहे. फक्त जत तालुक्यात सहा शाखा असून शिराळा, खानापूर या तालुक्यात प्रत्येकी फक्त एक शाखा. आटपाडी,वाळवा, मिरज, तासगाव,पलूस तालुक्यात प्रत्येकी दोन शाखा आहेत. त्यामुळे वाडी-वस्ती वरील,खेड्यातील शाळा प्रमुखांना गरज नसताना सुरु असणारी बँक खाती बंद करुन प्रशासनाने एकाच बँकेत खाती उघडण्यासाठी सक्ती करु नये अशी विनंती केली आहे. जिल्ह्यातील शाळा विद्यार्थी उपस्थितीसह नियमित सुरु असल्याने मध्यान्ह भोजन सुरु करणे, शिक्षकांना कोविड कामकाजातून मुक्त करण्यासह अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत विस्तृत चर्चा केली. मुख्याध्यापक पदोन्नतीमुळे शिक्षकांचे  समायोजन करणे, कन्नड विभागातील वरिष्ठ मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे भरणे, भ.नि.निधी प्रलंबित बीले मिळण्यासाठी बी. डी. एस. प्रणाली सुरू करणे, सन २०१५/१६ मधील मिरज तालुक्यातील शिक्षकांच्या भ.नि.निधी ऑनलाईन/ऑफलाईन जादा कपात रकमा परत करणे, ऑगस्ट २०१४ मधील नियुक्त विषय शिक्षकांना रुपये ४३०० ग्रेड वेतन लागू करणे, सन २०२०/२१ भ.नि.निधीच्या स्लिपा मिळणे, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची पेन्शन विक्री, गटविमा, पेन्शन मिळणे इत्यादी प्रश्‍नांबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे जिल्हा सरचिटणीस  दयानंद मोरे, कार्याध्यक्ष सतिश पाटील यांनी सांगितले.
          यावेळी शिक्षक नेते किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, शशिकांत भागवत, कार्यकारी अध्यक्ष उध्दव शिंदे, कोषाध्यक्ष माणिक पाटील, शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव, राजाराम सावंत, शिवाजी पवार, शशिकांत बजबळे, सुनिल गुरव, महादेव माळी, श्रेणिक चौगुले, बाळासाहेब आडके, राजाराम शिंदे, उत्तम पाटील, विष्णू रोकडे, सर्जेराव लाड, अरुण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
To Top