सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे काम निश्चितच आदर्श, कौतुकास्पद आणि गुणवत्तापूर्ण असून अशा प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न ऐकण्यासाठी व सोडवण्यासाठी माझे दालन सदैव खुले असल्याचे मत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास समोर व्यक्त केले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषदेच्या नोकरीत सामावून घेण्याचे काम अत्यंत जलद व विनातक्रार पार पाडल्या बद्दल श्री. डूडीसाहेब यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी साहेब म्हणाले मॉडेल स्कूल संकल्पना अत्यंत चांगली असून जिल्ह्यातील शिक्षकांच्या पाठबळामुळेच ही संकल्पना चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे. पुढील काळात आणखीन १३४ शाळा नव्याने यामध्ये समाविष्ट होतील. प्राथमिक शिक्षकांच्या, शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये आपण नेहमीच सकारात्मक राहू.
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. विनायक शिंदे व अविनाश गुरव म्हणाले अजून मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक देणे शासनाकडून मिळालेली नाहीत परंतु त्यांना नोकरी देऊन दिलासा देण्याचे काम आपण केले आहे.
यावेळी हंबीरराव पवार, अरुण पाटील, तानाजी खोत, नितीन चव्हाण, फत्तेसिंग पाटील, दगडू येवले, श्रीकांत पवार, अशोक महिंद, अशोक पाटील, महादेव हेगडे, फत्तु नदाफ, दिलीप सानप यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.