" जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धरी " या उक्तीप्रमाणे कुटुंब घडवण्याचे काम महिला करत असतात. आज जगामध्ये सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती, यशस्वी पुरुष यांच्या पाठीमागे कर्तृत्ववान स्त्रियांचाच हात असतो. राष्ट्रमाता जिजाऊनी शिवरायांना घडविले म्हणूनच हे स्वराज्य उभा राहिले. महात्मा फुले यांच्यापाठीमागे सावित्रीबाई फुले उभ्या होत्या. त्यांच्यामुळेच महात्मा फुले आपले शैक्षणिक, सामाजिक काम पूर्ण करू शकले. आज आधुनिक काळातही स्त्री प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहेत. असे उद्गार डॉ.जोस्त्ना मेटकरी यांनी काढले. त्या सौ. विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विटा येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रशालेचे संस्थापक व साहित्यिक रघुराज मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, कार्यवाह योगेश्वर मेटकरी उपस्थित होते. प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी आपल्या मनोगतात महिला शिक्षणावर भाष्य केले.त्या म्हणाल्या की, महिलांच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन आहे. अस असल तरी किमान महिला दिनाव्यतिरिक्त नेहमीच महिलांचा गौरव होणे आवश्यक आहे. संस्थापक रघुराज मेटकरी म्हणाले यांनी अनेक ऐतिहासिक दाखले देवून महिलांची महती स्पष्ट करून सांगितली.कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी महिलांचे महत्व स्पष्ट करून देताना अनेक दाखले आणि उदाहरणे देवून क्रोध आणि शांततेला एकत्र करण्याची ताकत फक्त महिलांच्यामध्ये आहे. असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी प्रशालेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी सुंदर अशी " मुलगी वाचवा मुलगी शिकवा " या आशयाची नाटिका सादर केली.प्रशालेच्याविद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.जोस्त्ना मेटकरी यांची मुलाखत घेतली. महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज प्रशालेत दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळच्या सत्रात वेशभूषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा पार पडली. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमास सुनीता पवार,चंदना तामखडे, रेखा मेटकरी, स्वप्नाली भिंगारदेवे,वैशाली लोखंडे, स्वाती कुपाडे,शितल बाबर, राजू गारोळे,अभिजीत निरगुडे, तात्यासो शेंडगे, तोसिम शिकलगार,असिफ मुजावर यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा साळुंखे,प्रास्ताविक गौरजा रंगाटे हिने केले. तर आभार रेणुका जगदाळे हिने मानले.