सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे.यादरम्यान शिक्षक संघाचे नेते संभाजी (तात्या) थोरात यांनी कल्पना शक्तीने थेट शिक्षक बँकेलाच चाके जोडली.नुसती चाके जोडून थांबतील ते तात्या कसले ? त्यांनी बँकेला चाके असती तर...? नेत्यांनी बँक अंकलखोप गावी नेली असती असा आरोप केला.आता हा बाण शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ (आण्णा) मिरजकर यांच्या दिशेने होता.श्री क्षेत्र औदुंबर येथे आण्णा पुरोगामी सेवा मंडळ पॅनेलचा प्रचाराचा नारळ फोडण्यात व्यस्त होते.सांगली व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.विरोधकांचे कामकाज हे केवळ सोशल मीडियावरून चालते...आम्ही मात्र काम करणाऱ्यांची पिढी उभारली असाच सूर सर्व नेत्यांच्या मनोगताचा होता.कार्यक्रम संपला...जेवणही आटोपली...इतक्यात मोबाईल वरून मेसेज ची धून वाजली.एका जागृत पत्रकाराने मेसेज चेक केला नि....जे स्वप्नी दिसे ते मनी वसे असे म्हणतात....कधीकधी बोलाला नि फुलाला गाठ पडते असेच घडले.पुन्हा एकदा विरोधक सोशल मीडियावर तत्पर असल्याचे दिसले.आटपाडी येथे स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाची प्रचार सभा पार पडली.त्यात संभाजी तात्यांनी थेट मिरजकर आण्णांच्या दिशेने बाण सोडला.
"शिक्षक बँकेला चाके असती तर..? शिक्षक समितीच्या नेत्यांनी बँक त्यांच्या स्वगृही म्हणजेच थेट अंकलखोप ला नेली असती.यावेळी बँकेत सत्ता परिवर्तनाची गरज आहे.अन्यथा बँकेची अवस्था आणखीनच दयनीय होईल.स्वाभिमानी शिक्षक मंडळाची सत्ता आल्यानंतर आपण थेट कारभारात लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले."
यावेळी पत्रकारांनी संभाजी तात्यांच्या या शोधावर मिरजकर आण्णांनी प्रतिक्रिया द्यावी अशी विनंती केली.त्यांनी तात्यांच्या आरोपाला थेट अंकलखोपचे पाणी दाखविले.
"बँक अंकलखोपला नेली म्हणणारांना बँकेतील काही माहिती नाही, पण लोकांच्या पैशावर चैनी करणे चांगले माहित आहे. ज्यांना शिक्षक बँकेतील काही कळत नाही, बँकेसाठी काही योगदान नाही, शिक्षकांच्या प्रश्नावरील संपातून पळून जाणा-या संभाजी थोरातांना माझ्या वर किंवा बँकेवर बोलण्याचा अधिकार नसल्याची सडकून टिका केली. बारा संघटना म्हणजे बारा ठीगळांची वाकळ सुई दोऱ्याने शिवणाऱ्या नेत्या ला टाके घालत पुढे जाताना आपण दोऱ्याला गाठ मारायचे विसरल्याचे लक्षात आले नसल्याचा खोचक व सूचक इशारा द्यायला ही मिरजकर आण्णा विसरले नाहीत."
शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर व शिक्षक संघाचे नेते संभाजीराव (तात्या) थोरात या दोन नेत्यांमध्ये प्रचाराच्या शुभारंभालाच आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत.नमनालाच वातावरण तापू लागले आहे.आता त्रिमूर्ती संबोधले जाणारे सत्ताधारी पॅनेल हाईट्रीक करणार की,बारा संघटनांची वज्रमुठ सत्तांतर घडविणारं याच भवितव्य मात्र सुज्ञ गुरुजन मतदारच ठरवतील....निवडणुका येतील जातील...आरोप प्रत्यारोप होतील...खुर्चीत नवनव्या नेतृत्वाला, चेहऱ्यांना संधी मिळत राहतील... तुम्ही बँक चाकावर बसवा.... ती कुणाच्याही गावच्या दिशेने खेचा... पण तिच्या प्रगतीची चाके मात्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत रूतवू नका...कारण ती सर्वसामान्य शिक्षक,कर्जदार,कर्मचारी अन् ठेवीदारांची कामधेनू आहे...!
आपले नम्र
✌ बँकवाले गुरुजी...✌