पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयात पलूस केंद्रस्तरीय आनंददायी शिक्षण प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमोल पवार, बालभारतीचे लेखक - कथाकार संदीप नाझरे, केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे, पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे करांडे , पंचायत समिती विषयतज्ञ सौ.सुवर्णा थोरात , ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब लाड, मुख्याध्यापक राम चव्हाण ,मारुती शिरतोडे, बी एन पोतदार उपस्थित होते.
यावेळी डाँ. अमोल पवार म्हणाले शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. अन्न वस्त्र निवारा याबरोबर शिक्षण व आरोग्य ही सध्याची मुख्य गरज आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी कटिबद्ध राहून हा उपक्रम राबवला जात आहे. शिक्षक स्वतः आनंदी असतील तर विद्यार्थी आनंदी राहतील. आज समाजामध्ये नैतिक मूल्य ढासळत आहेत. विद्यार्थ्यांच्या कोमल मनावर संस्कार करण्यासाठी हॅप्पीनेस प्रोग्रॅमची खूप आवश्यकता आहे असे सांगून सर्वांना या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
लेखक संदीप नाझरे म्हणाले, कोरोनाकाळात मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी निराशाग्रस्त, एकाकी, आक्रमक, बनत आहेत. गेम्सच्या आहारी जात आहेत. त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या अभिव्यक्ती जागृत करण्यासाठी कथा सांगणे त्यावर विचार मनन करायला लावणे गरजेचे आहे.
गोष्टी सांगणारी आई इडियटबॉक्सच्या डेलीसोपमध्ये अडकली आहे. आई वडील मुलांचा संवाद हरवला आहे. म्हणूनच मुलांना कथा सांगून संस्कारबीज पेरणे आवश्यक आहे.कोणतीही कथा ही मुलांच्या आयुष्याला सुंदर वळण देते. कथेतून जीवनविषयक मूल्ये समजतात . रामायण महाभारतातील कथा , संस्कारकथा, आजी-आजोबांच्या गोष्टी मुलांना ऐकायला मिळत नाहीत. ही संधी शिक्षकांनी निर्माण करून द्यावयाची आहे. कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण होऊ शकते असे सांगितले आपल्या सुंदर कथेचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
हँपीनेस प्रोग्रॅम विषयी सविस्तर मार्गदर्शन सुनील पुदाले,नारायण माळी, , तेजल शितापे, मारुती शिरतोडे ,महादेव जाधव , हणमंत मंगसुळे सिराज सुतार , अजय काकडे, मंगल दिवाण यांनी केले.
मुख्याध्यापक टी.जे करांडे सर म्हणाले मुलांना चांगले संस्कार महत्त्वाचे आहेत कुटुंबातील नातेसंबंध दृढ झाले पाहिजेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या भावनांचा- कल्पनांचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने त्याला विविध संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अध्ययन अध्यापन आनंददायी असले पाहिजे .
विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मुक्त करावयाचे आहे माणूस घडवणे हेच खरे शिक्षण आहे यासाठी अशी प्रशिक्षण खूप महत्त्वाची आहेत असे सांगितले.आभार नारायण माळी यांनी मानले.सर्वांचे स्वागत बी एन पोतदार यांनी केले. आनंददायी शिक्षण प्रशिक्षणाचा उद्देश केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे यांनी विशद केला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक टी.जे करांडे व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.