शिक्षक प्रश्नी तात्काळ वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन मागवू असे आश्र्वासन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव यांच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. यावेळी आंतरजिल्हा बदलीने सांगली जिल्ह्यामध्ये हजर झालेल्या अनेक प्राथमिक शिक्षकांची अंशदान पेन्शन योजनेमध्ये झालेली कपात रक्कम अनेक वर्ष होऊन सुद्धा पूर्वीच्याच जिल्हा परिषदेकडे अडकून आहे त्याबाबत स्वतः वर्गणीदार शिक्षकच पूर्णतः अनभिज्ञ असून सदरची रक्कम वर्ग करण्याबाबत कोणत्याही हालचाली जिल्हा परिषद किंवा शासन स्तरावरून सुरू नाहीत, त्याबाबत तातडीने वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन मागवण्याच्या सूचना संबंधितांना श्री. डुडी यांनी केल्या.
सांगली जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतन श्रेणी पात्र असलेल्या प्राथमिक शिक्षकांना सदरची वेतनश्रेणी देताना पडताळणीची आवश्यकता नसून तात्काळ वेतन श्रेणी देण्याबाबतचे पत्र काढण्याच्या सूचना दिल्या. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या प्राथमिक शिक्षकांचे अंशदान पेन्शन योजनेमध्ये केलेली कपात भविष्य निर्वाह निधीमध्ये वर्ग करणे बाबतचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडून जिल्हा परिषदेकडे परत आलेला आहे त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. समग्र शिक्षा अंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षातील शालेय अनुदान पी. एफ. एम. एस. द्वारे प्राप्त झाले असून काही पंचायत समिती मध्ये सदरचे पूर्ण आर्थिक वर्षाचे अनुदान तात्काळ सी.आर.सी. स्तरावरच खर्च करण्याची सक्ती शिक्षकांना केली जात आहे, त्याबाबत पंचायत समितीला सूचना दिल्या जातील. तसेच नास परीक्षेचा निकाल ज्या फॉरमॅटमध्ये मागितला आहे ते अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे आम्ही नवे सुलभ फॉर्मेट देऊ तोपर्यंत शिक्षकांनी ऑनलाइन निकाल भरू नये अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.
शिष्ट मंडळामध्ये शिक्षक बँकेचे संचालक शामगोंडा पाटील, शब्बीर तांबोळी, अजितराव पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील, आनंदा उतळे, विशाल मोरे यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.