हरिपूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ उत्साहात झाला. खो-खो खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच, राष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक डॉ. प्रशांत इनामदार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन वृक्षसंवर्धनासाठी रोपाला पाणी घालून, मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रज्ज्वलीत क्रीडा ज्योतीचे रोहन करून अनोख्या पद्धतीने करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक सुहास कोळी यांनी केले.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रशांत इनामदार म्हणाले की, "विद्यार्थी जीवनापासून अभ्यास व खेळ सोबत असेल तर जीवनात मोठी क्रांती होऊ शकते. दररोज किमान एक तास मैदानावर मनसोक्त खेळलं पाहिजे . आपल्या आवडत्या खेळात आपण करिअर करू शकता. त्यासाठी नियमित सराव आणि परिश्रम घेतले पाहिजेत. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीने अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मुलींनी आणि पालकांनी यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी मोबाईलचा हव्यास टाळावा. ज्ञानासाठीच मोबाईलचा वापर करा. मोबाईल गेममुळे आयुष्याचा खेळ होवू शकतो.उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळा. फास्टफूड ,कोल्ड्रिंक्स टाळा. वाचनाचा छंद तुमचा आयुष्य अधिक सुंदर करेल असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
क्रीडा महोत्सवाचे संयोजन क्रीडा मार्गदर्शक सौ. पूजा पाटील व राजकुमार हेरले यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी तर आभार राजकुमार हेरले यांनी मांनले याप्रसंगी सौ. संध्या गोंधळेकर, मनीषा वड्डदेसाई ,राजाराम वावरे, बबन शिंदे अजितकुमार कोळी यांनी खो-खो कबड्डी खेळाचे पंच म्हणून काम पाहिले.