संपूर्ण विद्यार्थीवर्गासाठी प्रेरणादायी असलेल्या 'वारणाकाठचे तारे' या पुस्तकाचे दररोजच्या शालेय परिपाठात विद्यार्थ्यांकरवी वाचन करून पुस्तकातील दिग्गज व्यक्तिमत्वांची माहिती पोहोचविणाचा उपक्रम कणदूर ता. शिराळा येथील श्री दत्त विद्यालयात सुरू करण्यात आला आहे. या वाचनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे .
'वारणाकाठचे तारे' हे पुस्तक कोकरूड येथील पत्रकार नारायण घोडे यांनी लिहिले आहे .आतापर्यंत या पुस्तकाचे दोन भाग प्रकाशित झाले आहेत. कणदूर येथील दत्त विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सहदेव खोत यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाचे दररोजच्या परिपठात वाचन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला . सहदेव खोत यांनी सुरुवातीला पुस्तक परिचय करून दिला . त्यानंतर परिपठात विद्यालयाची विद्यार्थीनी प्रांजली शेळके हिने शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व , पोलीस दलातील अधिकारी विश्वास नांगरे- पाटील यांच्याविषयीचा पुस्तकातील पहिला लेख विद्यार्थ्यांना वाचून दाखविला . आता दररोज पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिमत्वाची ओळख विद्यार्थ्यांना होणार असून , त्यातून त्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे.
मुख्याध्यापक एस के पाटील, शिक्षक बी एस पाटील, संग्रामसिह पवार, प्रल्हाद परीट, राजश्री पवार, अजित शिंदे, अर्चना शेळके, राजश्री पाटील, किरण शेळके, संपत पवार, मारुती कुंभार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनाही हा उपक्रम खूप आवडला.