Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील बाल वारकऱ्यांची आषाढी एकादशी निमित्त दिंडी ; भिलवडी गावातील नागरिकांनी केले उत्साहमय वातावरणात स्वागत.

खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील बाल वारकऱ्यांची आषाढी एकादशी निमित्त दिंडी ; भिलवडी गावातील नागरिकांनी केले उत्साहमय वातावरणात स्वागत.



भिलवडी प्रतिनिधी
अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मधील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त गावातून बाल वारकऱ्यांची दिंडी व माऊलींचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ठिकठिकाणी महिला नागरिक व महीला वर्गांकडून दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.


माऊली... माऊली.... जय जय रामकृष्ण हरी .....ज्ञानोबा माऊली तुकाराम....च्या जयघोषात ... टाळ मृदुंगाच्या गजरात दौडणाऱ्या आश्वा सोबत रंगलेला रिंगण सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.प्रारंभी बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सुचेता कुलकर्णी यांच्या हस्ते पालखी व आश्वाचे पाद्यपूजन करण्यात आले.


भाळी गंधबुक्का लावलेले,भगव्या पताका व तुळशी वृंदावना सोबत सहभागी झालेले पाचशे वर बाल वारकरी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या बाल वारकऱ्यांनी हातात टाळ, मृदंग, भगवे झेंडे, तुलसी वृंदावन घेऊन विठू नामाचा जयघोष केला. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी वारी, रिंगण सोहळे, पालखी, अभंगाचे उत्कृष्ठ असे सादरीकरण केले. सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोषाख परिधान केला होता.भिलवडी शिक्षण संकुल ते भिलवडी गावातून दिंडी काढण्यात आली.


भिलवडी ग्रामपंचायती समोरभिलवडी गावच्या सरपंच सौ.विद्या पाटील,ग्रामपंचायत सदस्य सौ.रुपाली कांबळे, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक संजय कदम, सचिव मानसिंग हाके, .भ. प.सौ.भारती पाटील महाराज आरती करून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.ग्रामपंचायत भिलवडी व शाळेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी पालकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,संजय पाटील,शरद जाधव,विठ्ठल खुटाण,प्रगती भोसले,अर्चना येसुगडे,पूजा गुरव,सारिका कांबळे,प्रियांका आंबोळे, स्वाती भोळे,करिश्मा शिकलगार,मंजुषा मोरे आदी शिक्षकांनी दिंडी सोहळ्याचे नेटके संयोजन केले.संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे घनःश्याम रेळेकर व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.


To Top