छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य हे एका राजाचे नव्हते, तर ते रयतेचे होते. शिवराज्याभिषेक हा स्वराज्यातील रयतेच्या स्वातंत्र्याचा सोहळा होता. हा खरा रयतोत्सव होता असे प्रतिपादन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.छत्रपती मराठा साम्राज्य - CMS तर्फे दुबईमधील पहिला शिवराज्याभिषेक सोहळा एस.एस.प्रायव्हेटट स्कूल, दुबई येथे साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) ग्रुप, दुबई यांच्यातर्फे दुबई येथे पहिला शिवराज्याभिषेक दिन सोहळा १८ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला.ज्येष्ठ सिनेअभिनेते,संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे, इतिहास संशोधक केतन पुरी, शाहीर प्रा. मुकुंदा भोर पाटील, डॉ. सुरज मोटे, विक्रम भोर, राहुल घोरपडे, विजय कदम, संतोष गायकवाड, विजेंद्र सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढे बोलताना डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, शिवचरित्रातून प्रेरणा घेत जीवनाची वाटचाल करावी. शिवराय वाचून, समजून घेऊन त्यांचे विचार आचरणात आणावे. आज-कालच्या युवकांनी दगड उचलून दंगल करण्यापेक्षा जबाबदारी घेऊन जगभरात प्रगतिशील वाटचाल करावी हा संदेश दिला.
यावेळी शिवाजी महाराजांच्या जगभरात असलेल्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन इतिहास संशोधक, मराठा पातशहा पुस्तकाचे लेखक केतन पुरी यांच्या माध्यमातून भरवण्यात आले. केतन पुरी यांनी शिवराय कसे दिसायचे, त्यांचे चित्र, चरित्र, चारित्र्य कसे होते? ०६ जून, रायगड आणि शिवराज्याभिषेक दिन याचे महत्त्व आणि ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे वर्णन दुबईकरांना सांगितले.
शिवशाहीर प्रा. मुकुंदा भोर पाटील यांच्या गगनभेदी आवाजात विश्ववंदनीय शिवराय, क्रांतिसिंह नाना पाटील आणि या देशाला जिजाऊ चा शिवबा पाहिजे हे पोवाडे सादर केले.जिजाऊ वंदना आणि विक्रम भोसले, मुकुंदराज पाटील यांच्या पहाडी आवाजातील शिवगर्जनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. अभिजीत देशमुख यांनी सीएमएस ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला.
विनायक पवार यांच्या माध्यमातून दुबई येथे चित्रकला स्पर्धेचे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील महिलांनी सुरू केलेल्या दुबईमधील मधील पहिल्या "स्वामिनी" महिला ढोल ताशा पथक यांच्याकडून ढोल ताशाच्या गजरात मानवंदना देण्यात आली. मिलिंद माणके यांनी राज्याभिषेका वरील गीत सादर केले.अद्वैत देशमुख, आराध्या बोरवके, दृष्टी , उर्वी जगताप, प्रज्ञा आणि प्रणाली पवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन शोभा वाढवली.
दुबई मधे होणाऱ्या पहिल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी महाराजांचे १३वे वंशज आणि आमदार छ्त्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि प्रवीण दादा गायकवाड यांनी चित्रफिती मार्फत कार्यक्रमासाठी शिव-शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जगताप, रूचिरा पवार आणि पंकज आवटे यांनी केले. दुबईमधील मराठी नवउद्योजकांचा, विविध सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत देशमुख, विक्रम भोसले, अमोल डुबे पाटील, संदीप कड, सुनिता देशमुख, सुहास झांजे, शिवाजी काका नारुने, रघुनाथ सगळे, अक्षय माने यांनी केले. अभिजीत इगावे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला दुबईमधील गिरीश पंत, सुशील मोझर, विनोद जाधव, राजेश बाहेती, अनिता महांगडे, विद्या चोरगे, अनिल थोपटे, चंद्रशेखर जाधव, आशिष जगताप, सुशांत चिल्लाल, स्वप्नील जावळे आणि संयुक्त अरब अमिराती मधील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.