भिलवडी प्रतिनिधी:
सुभाष कवडे यांची कविता माणसाला दु:खामध्ये खचून न देता त्याच्या मनात लढण्याचा प्रकाश पेरणारी, सकारात्मक वृत्ती निर्माण करणारी कविता आहे. भंगत जाणाऱ्या माणसाचा वेध घेणारी कविता, मनाला अस्वस्थ करणारी आहे.प्रकाश पेरणी हा कविता संग्रह मराठी काव्य सृष्टीत आपले वेगळे स्थान अधोरीखीत करणारा आहे असे मत डॉ.राजेंद्र माने (सुप्रसिद्ध साहित्यिक सातारा ) यांनी भिलवडी येथे व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह व सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभात डॉ. माने बोलत होते. सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे संपन्न झालेल्या प्रकाश पेरणी काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी चे अध्यक्ष अमरसिंह देशमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळाचे सदस्य प्रा.प्रदीप पाटील होते.
डॉ.राजेंद्र माने यांचे हस्ते प्रकाश पेरणी या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने झाली. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले.
या प्रसंगी बोलताना सुभाष कवडे म्हणाले की,कवितेने मला जगण्याचे आत्मभान व भरभरून आनंद दिला आहे. हेवेदावे,द्वेष,मस्तर याच्या पलीकडची जगण्याची दृष्टी दिली आहे. पैश्यापलीकडचे जग दाखविले आहे. माझा प्रकाशपेरणी हा कविता संग्रह माणसाना सकारात्मक जगण्याची दृष्टी देयील.हा संग्रह मराठी वाचकांना निश्चित आवडेल याची मला खात्री आहे.
याप्रसंगी बोलताना अमसिंह देशमुख म्हणाले की,सुभाष कवडे यांची जन्म भूमी माणदेश आहे.माणदेशाला खूप मोठी साहित्य परंपरा असून सुभाष कवडे यांचे सर्व साहित्य व प्रकाश पेरणी कविता संग्रह माणदेशाची समृद्ध साहित्य परंपरा पुढे चालविणारा आहे. प्रकाश पेरणी कविता संग्रहातून मिळणारी जीवनमूल्ये माणसाना समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारी आहेत.
प्रा.प्रदीप पाटील म्हणाले की, निसर्ग शेती माणूसपण श्रद्धा भक्ती या विषयीची ओढ हे सुभाष कवडे यांच्या कवितेतील वैशिष्ट आहे.मानवी सदभावना, माणुसकी,
परिस्थितीशी संघर्ष करण्याची दृष्टी प्रकाश पेरणी संग्रहातून दिसून येते. माणसा माणसातले अंतर, दुभंगलेपण, उपभोगवृत्ती अश्या आजच्या काळात मानवी मुल्यांचा आग्रह धरून जगण्यावरचा विश्वास वाढविणारा कविता संग्रह म्हणून सुभाष कवडे यांचा प्रकाश पेरणी कविता संग्रह लक्षणीय ठरणारा आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,सुभाष कवडे यांनी खऱ्या अर्थाने प्रकाश पेरणी कविता संग्रह प्रसिद्ध करून दिवाळीचा प्रकाश उत्सव अधिक प्रकाशदायी केला आहे. या संग्रहातील कविता निष्ठा, माणुसकी, निसर्गप्रेम, मानवता, प्रामाणिकपणा आदी मुल्ये समाजावर रुजविणाऱ्या आहेत. सुभाष कवडे यांची विठ्ठल भक्ती संग्रहातून ठायी ठायी जाणवते.त्यांचे जगणे प्रमाणिक असल्यामुळे काव्य लेखनही प्रमाणिकपणाचे दर्शन घडविते. सुभाष कवडे यांचे हे १६ वे पुस्तक असून कविता संग्रह ५ वा आहे. हि त्यांची साहित्य साधना सर्वानसाठी भूषणावह आहे.
या प्रकाशन सोहळ्यासाठी सौ मनीषा पाटील,रमजान मुल्ला हिम्मत पाटील महादेव माने,सुधीर कदम,दिनेश देशमुख,प्रकाश नमदास या साहित्यिकासह भू.ना. मगदूम ए.के.चौगुले,जी.जी.पाटील, बी.डी.पाटील,सुधीर खलिपे,दगडू दाते,जगदीश कवडे,तात्या कोरे,शाहीर पाटील,पुरषोत्तम जोशी, जयंत केळकर,वाचनालयाचे सर्व सेवक वाचनालयाचे सर्व सेवक,पदाधिकारी व भिलवडीतील साहित्यप्रेमी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन विठ्ठल मोरे यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले. यावेळी भिलवडी आणि परिसरातील २५ हून अधिक सामाजिक संस्था व वाचनालये यांना प्रकाश पेरणी कविता संग्रहाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या.