हरिपूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर हा 'पक्षी सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलच्या 'राष्ट्रीय हरित सेना' विभागाच्या वतीने पक्षी तज्ज्ञ शरद आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाकाठी पक्षी निरीक्षण व क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शरद आपटे यांनी पक्षांची व्याख्या, त्यांचे स्थलांतर, जीवसृष्टी-अन्नसाखळी व पर्यावरण रक्षणातील पक्षांचं स्थान, पक्षांच्या प्रजाती, आधिवास याबद्दल सखोल माहिती दिली. सकाळी सात वाजता हरिपूरमधील कृष्णाकाठी पक्षी निरीक्षणास सुरुवात केली. कृष्णापात्रात आढळणारे अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी यावेळी आढळले. पक्षांची चोच, पाय,पंख,पिसे, रंग, आकार यावरून अनेक पक्षांचा परिचय विद्यार्थ्यांना शरद आपटे यांनी करून दिला. 'बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेन्ट' या ऑक्सफर्ड पुस्तकाद्वारे आपण पक्षांची शास्त्रीय व सविस्तर माहिती कशी अभ्यासायची हे पक्षी निरीक्षणावेळी विद्यार्थ्यांना सोदाहरण दाखवले.
विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासावा. निसर्ग पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूक असावे. 'बर्ड सॉंग' या संस्थेचे सभासद होऊन, विविध उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी शरद आपटे यांनी केले.
या क्षेत्रभेटीवेळी हरिपूर महापूरामध्ये का वाचते..? याचे भूशास्त्रीय, भौगोलिक कारण आणि नदीचे प्रदूषण याबद्दल विठ्ठल मोहिते यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नदीकाठी माहिती दिली.
याचे आयोजन मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार, सौ संध्या गोंधळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजकुमार हेरले ,पूजा पाटील व विठ्ठल मोहिते यांनी केले.