भिलवडीकरांचा निर्धार संग्राम देशमुख यांनाच करणार आमदार ;प्रचंड जल्लोषात पदयात्रा; संग्राम देशमुख; अपर्णाताई देशमुख दाम्पत्याचा सहभाग
भिलवडी प्रतिनिधी : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी आज पत्नी सौ. अपर्णाताई देशमुख यांच्या सोबत भिलवडी येथे पदयात्रा काढली. देशमुख दाम्पत्याच्या सहभागाने कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींच्या उत्साहाला उधाण आले. संग्राम देशमुख हेच आपले आमदार असा निर्धार भिलवडीकरांनी केला.
संग्राम देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, पुरपट्ट्यातील मच्छीमारांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवली जाईल. मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. गेल्या काही वर्षातील मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला एकदा संधी द्या. आता हीच खरी परिवर्तनाची वेळ आली आहे. आपण सर्वांनी मिळून परिवर्तन घडवूया आणि या मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग धरूया. असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले.
आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संग्राम देशमुख यांनी भिलवडी येथे पदयात्रा काढली. हलगी घुमक्याच्या तालावर फटाक्यांची आतषबाजी करत भिलवडीकरांनी प्रचंड उत्साहात देशमुख दाम्पत्यांचे स्वागत केले. भिलवडी येथील मारूती मंदिरा पासून पदयात्रेचा प्रारंभ झाला. पाटील गल्ली, मधली गल्ली, जैन बस्ती, वाळवेकर गल्ली, पंचशिल नगर, साठे नगर, साखरवाडी, ऐतवडे चौक, बाहेरील गल्ली, भोई गल्ली, दत्तनगर, संपूर्ण गावातून पदयात्रा विविध मार्गाने काढण्यात आली. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच सुवासिनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. देशमुख दाम्पत्याने ज्येष्ठांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह होता. जल्लोषपूर्ण घोषणा देत संग्राम देशमुख यांना आमदार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
रमेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर, दिपक मगदूम, तानाजी भोई, श्रीकांत निकम, मन्सूर मुल्ला, मुनिरखान पठाण, उल्हास ऐतवडे, दीपक चौगुले, प्रमोद ऐतवडे, मनिष कुलकर्णी, खंडू भिसे, वसंत ऐतवडे, सौ. जयश्री शेवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. कांचन भोई, सौ. क्रांती पाटील,आशाताई मोहिते यांच्यासह वसगडे, बह्मनाळ, भिलवडी स्टेशन, खटाव, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाची वाडी, धनगाव, भुवनेश्वरवाडी या गावातील कार्यकर्ते पद यात्रेत सहभागी झाले होते.