पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा करणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवाराला जागा दाखवा : संग्राम देशमुख; ब्रह्मनाळ येथे प्रचंड जल्लोषात पदयात्रा
पलूस प्रतिनिधी :
महापुरामध्ये माणसं मरत असताना पूरग्रस्तांची चेष्टा करणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून द्या, आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू असे आश्वासन, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिले. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार घोषणाबाजी करत संग्राम देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
हालगी घुमक्याचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी अशी जल्लोष पूर्ण पदयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली. ठिकठिकाणी सुहासिनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांनी आशिर्वाद दिले. यावेळी परिवर्तन घडविण्यासाठी तरूणांनी हिरीरीने पदयात्रेत सहभाग घेतला होता. नागरिकांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराने कशा पद्धतीने पूरग्रस्तांची चेष्टा केली त्याचा पाढा वाचला.
संग्राम देशमुख म्हणाले, ज्यावेळी ब्रह्मनाळकर पूरात अडकले होते तेव्हा कॉंग्रेसचे उमेदवार पूराचा आनंद लुटत होते. ते आम्हाला विचारतात आम्ही कुठे होतो, आम्ही पूरग्रस्तांची मदत करत होतो. ते लोकांना माहिती आहे. तुम्ही पोस्टरबाजी करत फिरत होता.
लोकांसाठी तुम्हाला काम करता आलं नाही. तुम्हाला मत मागायचा अधीकार नाही. न्याय मिळावा म्हणून गावकऱ्यांनी आंदोलन केले. तुम्ही त्यांची चेष्टा केली. लोकांनी तुम्हाला गावबंदी करण्याचा प्रयत्न केला. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा करणाऱ्या कॉंग्रेसच्या उमेदवाराला उद्याच्या २० तारखेला जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या पाच वर्षांत तुमची सर्व कामे पूर्ण केली जातील. याची मी खात्री देतो.
अशोक अण्णा पाटील, महेश गावडे, हेमंत जगदाळे, अनिल लोटे, राजगुंडा पाटील, सचिन पाटील, विश्वजीत पाटील, ओंकार गावडे, तेजस जगदाळे, शेखर चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.