संग्राम देशमुख यांना निवडून द्या बाकिचं माझ्यावर सोडा, विकासाची गॅरंटी माझी : नितीन गडकरी, पलूस येथे जाहीर सभेत विजयाचा एल्गार ; गर्दीचा महापूर
पलूस प्रतिनिधी : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भविष्य बदलण्याची क्षमता असलेले कष्टकरी नेतृत्व संग्राम देशमुख यांना निवडून द्या बाकीचे सगळे विकासाचे माझ्यावर सोडा, विकासाची गॅरंटी मी देतो, विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने पळवा, असे आवाहन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पलूस येथील बाजार मैदानावर भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत नितीन गडकरी बोलत होते. पलूस तालुक्यातील महिला व नागरिकांच्या प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता. या सभेत संग्राम देशमुख यांच्या विजयाचा एल्गार पुकारण्यात आला.
माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, माजी आमदार महांतेश कवठगीमठ, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, दत्तूशेठ सुर्यवंशी, पलूस पंचायत समिती माजी सभापती प्रदीप मोहिते, प्रतिक्षा पाटील, सत्यजित यादव, विजयभाऊ पाटील, युवा नेते विश्वतेज देशमुख, अशोकराव साळुंखे, जयराज देशमुख, शिवसेनेचे प्रशांत लेंगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, बोधीसत्व माने, अमीर पठाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस तालुका अध्यक्ष प्रदीप सुतार, शिवसेना कडेगांव तालुकाप्रमुख प्रदीप कदम, भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग माने, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसूगडे यांची सुरवातीला भाषणे झाली. संग्राम देशमुख यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचा घोंगडे गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नितीन गडकरी म्हणाले, ही निवडणूक संग्राम देशमुख यांच्या भवितव्याची नाही तर जनतेच्या भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि ताकारी योजनेला केंद्रातून मी १२ हजार कोटी रुपये दिले आहेत. पाणी हा कळीचा मुद्दा आहे. कॉंग्रेसने त्यांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी आम्ही सिंचन योजना मार्गी लावल्या. त्यामुळे शेतकरी समृद्ध होत आहे. सांगली जिल्ह्यात ८ हजार कोटींची कामे आम्ही केली आहेत. माणूस गुणांनी मोठा असला पाहिजे पैशाने नाही. गुणांनी मोठं असणाऱ्या संग्राम देशमुख यांना तुम्ही निवडून द्या. बाकीचे सगळे माझ्यावर सोडा. पलूस कडेगावच्या विकासाची गॅरंटी मी देतो. केंद्रातून हवा तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस संग्राम देशमुख यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे बिनधास्तपणे आपण संग्राम देशमुख यांना निवडून द्या. आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने पळवा, असे आवाहन त्यांनी केले.
१० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार..शेतकरी अन्नदाता, उर्जादाता आणि आता हवाई इंधनदाता होईल. इथेनॉलवर चालणारी सर्व वाहने येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. सुमारे १० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले, कॉंग्रेस हा व्यापारी पक्ष आहे. त्यामुळे ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशातील जनता भिकारी अशी परिस्थिती होती. भाजपा महायुतीचे सरकार आल्यावर गेल्या दहा वर्षांत देशाचं चित्र बदललं आहे. सर्व खेडी जोडणारी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली आणि १लाख २० हजार कोटींचा जीडीपी वाढला. अत्यंत दुरावस्था असणाऱ्या खेड्यांचा विकास आम्ही केला. स्मार्ट व्हिलेज तयार केली. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही भाजपा महायुतीची कार्यपद्धती आहे.
भाजपा महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले, पलूसमध्ये कामे शून्य झाली आहेत. पलूस शहराचा आराखडा तयार करताना कोणाचा तरी स्वार्थ साधण्यासाठी चुकीच्या पद्धतीने केला आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यावर चुकिचा आराखडा रद्द करण्यात येईल. जनतेला अपेक्षित असा नवा आराखडा तयार करण्यात येईल. उद्योग, शेती आणि सर्व सामान्य माणसाच्या विकासासाठी मला एकदा संधी द्या.
अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्हीया मतदारसंघातील काही लोक सत्तेत आले की इंजिनिअरींग कॉलेज काढ, कुठली संस्था काढ, स्वतःच्या संस्था मोठ्या करण्यासाठी ते राजकारण करतात. शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही असा त्यांचा उद्योग आहे. त्यामुळे त्यांना आता दूर करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.