Sanvad News पलूस कडेगाव मतदार संघाच्या शेती, उद्योगाबरोबरच शाश्वत सर्वांगीण विकासासाठी संधी हवी - संग्राम देशमुख ; पिण्याचे पाणी,पाच हजार कोटींचा उद्योग, सिंचन योजनांची पूर्तता करणार

पलूस कडेगाव मतदार संघाच्या शेती, उद्योगाबरोबरच शाश्वत सर्वांगीण विकासासाठी संधी हवी - संग्राम देशमुख ; पिण्याचे पाणी,पाच हजार कोटींचा उद्योग, सिंचन योजनांची पूर्तता करणार

पलूस कडेगाव मतदार संघाच्या शेती, उद्योगाबरोबरच शाश्वत सर्वांगीण विकासासाठी संधी हवी - संग्राम देशमुख ; पिण्याचे पाणी,पाच हजार कोटींचा उद्योग, सिंचन योजनांची पूर्तता करणार 

 माझी भूमिका

                            @ थेट संवाद...

पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा कृषी, औद्योगिक तसेच सर्वांगीण विकास करणे हेच व्हिजन आहे. दोन्ही तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला काम करायचं आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो कायमचा सोडवाचा आहे. टेंभू आणि ताकारी योजनेचे पोट पाट पूर्ण करून वंचित क्षेत्रात पाणी पोहचवायचे आहे. त्यासाठी विधानसभेत जाण्याची संधी हवी आहे. असे मत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधी बरोबर बोलताना मांडले.


प्रश्न : आपण विधानसभा निवडणूकीच्या  मैदानात उतरण्याच नेमक कारण काय ?

संग्राम देशमुख : मंत्रीपद नाकारून ज्यांनी टेंभू योजना आणली त्या त्यागी तपस्वी अशा आमदार संपतराव अण्णा यांचा मी मुलगा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आणि हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अण्णांच्या नंतर माजी आमदार पृथ्वीराजबाबा यांच्याबरोबर मी जिल्ह्यात समाजकारण, राजकारण व सहकार क्षेत्रात काम करत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हा परिषद देशात पहिल्या क्रमांकावर आणली. जात, धर्म, पक्ष असा कोणताही भेदभाव न करता मागेल त्या गावाला निधी दिला. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकलो. विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. महापूर आणि कोरोना काळात लोकांच्या सेवेसाठी धावलो. त्याचे कुठेही मार्केटिंग केले नाही. मी निधी आणून विकास करू शकतो. लोकांच्या सेवेसाठी सहज उपलब्ध आहे. येणाऱ्या पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासाचा वेग बुलेट ट्रेनच्या गतीने करायचा आहे. यासाठी ही निवडणूक लढत आहे.

प्रश्न : यापूर्वी आपण केलेल्या विकास कामांचे नेमके स्वरूप कसे आहे?

संग्राम देशमुख : लोकांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची संधी मला मिळाली. अध्यक्षपदाच्या काळात जिल्हाभर काम केले. विशेषतः पलूस कडेगाव मतदार संघामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. जल जीवन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या पाणी योजना पूर्ण केल्या. अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. रस्ते, गटारी, मंदिरं, धार्मिक स्थळ यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. सुमारे आठशे कोटींची कामे केली आहेत.एखाद्या गावातला डीपी जळला, पाणी सोडायचं असेल, विशेष म्हणजे लोकांना कोणतीही अडचण आली तर लोक थेट मला फोन करतात. विकास कामांची यादी केली तर खूप मोठी आहे. कोरोना काळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस केला.महापूर काळात लोकांच्या मदतीला धावलो. लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.

 प्रश्न: आमदार झाल्यानंतर आपण कोणत्या कामांना प्राधान्य द्याल ?

संग्राम देशमुख : मतदारसंघांमध्ये गेल्या 30 वर्षात पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे.पलूस शहराबरोबरच अनेक गावामध्ये पिण्याचे पाणी द्यायचे आहे. शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करणार आहे. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना द्यायची आहे. त्यासाठी पाच हजार कोटींचे मदर युनिट इथे आणून इथल्या तरुणांना उद्योजक बनवण्याची संधी द्यायची आहे. संपतराव अण्णांच्या स्वप्नातील टेंभु व ताकारी योजना आता मतदार संघात आली आहे. परंतु अजून काही ठिकाणी पोटपाट काढून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी न्यायचे आहे.पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापूराचा फटका बसू नये यासाठी पूर संरक्षक भिंती बांधणे तसेच इतर उपाय योजना करून कायमचा तोडगा काढणार आहे.  ऊस पट्ट्यातील क्षारपड जमिनींचा प्रश्न मार्गी लावून जमीन सुपीक करण्यासाठी विशेष योजना राबविणार आहे. मतदार संघातील शासकीय भूखंड काही लोकांनी घेतले. ज्या उद्देशासाठी घेतले त्यासाठी न वापरता एकतर वेगळ्या कारणासाठी वापरतात किंवा तसेच पडून आहेत. ते सर्व शासकीय भूखंड, जमिनी शासनाला परत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतीपूरक उद्योग, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या विविध योजना, आणि तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभी करायची आहे. काही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही सोडवायचा आहे. एकंदरीत शेती, उद्योग आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करावी लागणार आहे. सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महत्वाचे म्हणजे लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या पहिल्या ऐकून घेणं आवश्यक आहे. म्हणून जनता दरबार भरवून सामान्य माणसाच्या समस्या प्रश्न जाणून घेऊ. त्या सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करणार आहे.

प्रश्न : तुमच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक  कशी वाटते?

संग्राम देशमुख : केवळ रस्ते आणि गटारी बांधणे म्हणजे विकास नव्हे.तर मतदार संघाचा शाश्वत विकास साधून सर्व सामान्य जनतेला अपेक्षित असणारी व आजपर्यंत कधीच न घडलेली परिवर्तनाची भूमिका घेऊन मी मैदानात उतरलोय.भारतीय जनता पार्टी महायुतीचा मी उमेदवार आहे. माझी लढत थेट कॉंग्रेसच्या उमेदवारा बरोबर आहे. त्यांचा आमच्यावर बिनबोभाट टीका करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.परंतु जनतेला काम कोण करत नि जाहिरातबाजी कोण करतं हे ज्ञात आहे .त्यांनी कितीही कट कारस्थाने केली,अमिषं दाखवली तरी जनतेला आता या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो हे कळून चुकलेलं आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती,सत्य आणि असत्य अशी ही लढत आहे. यावेळी जनशक्ती मोठी ठरणार आहे आणि सत्य जिंकणार आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट, आरपीआय आठवले गट आणि सोबत असलेले सर्व घटक पक्ष या सर्वांच्या परिश्रमाने आणि जनतेच्या साथीने विजय हा आमचाच होणार आहे.

To Top