Sanvad News विकासात्मक पायाभरणीवर विश्वजीत कदमांचा गड अभेद्य आणि अजिंक्य ही...

विकासात्मक पायाभरणीवर विश्वजीत कदमांचा गड अभेद्य आणि अजिंक्य ही...

विकासात्मक पायाभरणीवर विश्वजीत कदमांचा गड  अभेद्य आणि अजिंक्य ही.


सांगली / दि.२७/११/२०२४ 


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे निकालात काँगेस पक्षास मिळालेले यश पाहता..अनपेक्षितरित्या महाराष्ट्रात आलेल्या भगव्या त्सुनामी वादळात महाविकास आघाडी व घटक पक्षाचे गडकरी व गड जमीनदोस्त झाले.मात्र पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघात १ लाख ३० हजार ७७९ मते प्राप्त करीत ३० हजार ६४ मताच्या लीडने निवडणूक जिंकून डॉ.विश्वजीत कदम यांनी पश्चिम महाराष्ट्रात वादळात ही काँग्रेस पक्षाचा दिवा तेवत ठेवण्यात यश प्राप्त केले.केवळ आणि केवळ सातत्याने केलेल्या विकासकामांच्या पायाभरणीवर सलग तीन  वेळा त्यांनी आपला गड अभेद्य आणि अजिंक्य ठेवण्यात यश प्राप्त केले आहे.


काँग्रेससाठी आशेचा किरण....

कमीत कमी वयात केवळ आपल्या कर्तृत्वाने लोकप्रिय ठरलेले डॉ.विश्वजीत कदम काँग्रेस पक्षातील स्टार प्रचारक म्हणून देशभर परिचित आहेत.काँग्रेसचे कितीतरी नेते आपले संस्थान राखण्यासाठी तंबू सोडून भाजपच्याक ळपात दाखल झाले तरीही " माझ्या रक्तात काँग्रेस आहे." असे म्हणत त्यांनी संघर्षमय काळातही काँग्रेस वरील निष्ठा तसूभरही ढळून दिली नाही.

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना मतदारसंघातच जखडून ठेवण्याची गनिमी काव्याची रणनिती महायुतीने खेळली.मात्र अंतिम टप्प्यात मुत्सद्दीगिरीच्या जोरावर क्रांती समूहाच्या लाड पितापुत्रंचा साथ मिळवत विजयश्री खेचून आणली. त्यांचा हा विजय काँग्रेससाठी एक आशेचा किरण ठरला असून भविष्यात त्यांना पक्षीय राजकारणात मोठी संधीही प्राप्त होईल.दोन तीन वेळचे अपवाद वगळता या मतदार संघात स्व. डॉ.पतंगराव कदम साहेब व त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांची आमदारकी ठरलेलीच आहे.

साहेबांच्या पश्चात बाळासाहेबांच्या नावामागे पर्मनंट आमदार ही उपाधी जनतेनेच जोडली गेली.नेहमीच येतो पावसाळा तसे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने मैदान मारण्याची धमक कदम परिवारात पहावयास मिळते.यंदाच्या निवडणुकीत ही तसाच काही चमत्कार होईल अशी गृहितके  मांडून लाखाच्यावर लीड जाईल,विक्रमी मताधिक्याने विजयी होईल अशी गणिते मांडली.पण ती कितपत यशस्वी झाली हे संग्राम देशमुख यांना मिळालेल्या १ लाख ७०५ मतावरून लक्षात येतेच.

 जनतेशी असणारे विकासा पल्याडचे नाते...

डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या सारख्या दूरदृष्टीची जाणीव ठेवून भविष्याचा वेध घेणाऱ्या नेतृत्वाचा वारसा डॉ.विश्वजीत कदम यांनी समर्थपणे चालविला आहे.त्यांनी केलेली बाराशे कोटी वरील विकास कामे, भारती विद्यापीठ,सोनाहिरा सहकारी साखर कारखाना आणि समक्ष असलेल्या विविध संस्थातून कार्यरत निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी,गावागावांतील गल्ली बोळात विणलेले कार्यकर्त्यांचे,कर्मचाऱ्यांचे जनसंपर्काचे जाळे,विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम,विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मधील सवलत,भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून होणारी रुग्णसेवा,सत्तेत असू देत अगर नसू देत..विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून होणारी मदत,महापूर,कोरोना महामारी मधील कामकाज आदी त्यांच्या जमेच्या बाजू प्रभावीपणे जनमानसात रुजलेल्या आहेत.त्यात वेगळ सांगण्याची काहीच गरज नाही.हे समीकरण म्हणजे आधी केले नि मग सांगितले असेच.


लोक आंब्याच्या झाडालाच दगड मारतात...

इतकं सारं करूनही या नेतृत्वाला लोक विरोध का करतात? असा ही प्रश्न राज्यभरातील राजनिती तज्ञांना नेहमीच भेडसावतो.याचे कारण म्हणजे जनतेच्या अन स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या वाढत्या अपेक्षा,कधी त्या विकास कामाच्या बॅकलॉकसाठी, पोराबाळांच्या नोकरीच्या संधीसाठी असतील.गावागावांतील स्थानिक नेतृत्वात असणारा विसंवाद,गटबाजी,आपण सोडून इतरांना वरिष्ठ नेतृत्वांपर्यंत पोहोचून न देणारी नेत्यां-नेत्यांमधील स्वार्थी स्पर्धेची भिंत असेल.की ज्याला नेत्यांनी गावचा कारभारी बनविला आहे तो सक्षम  आहे किंवा नाही. मताधिक्य घटण्याची कारणे व शक्यता यावर सध्या उलटसुलट चर्चांना ऊत येऊ लागला आहे.एका बाजूने विजयाच्या हॅटट्रिकचा आनंदोत्सव साजरा करीत असताना मात्र बाळासाहेबांनी स्वतः या गोष्टींवर चिंतन करण्याची मात्र वेळ नक्की आली आहे.


जाता जाता...

कदम देशमुखांच्या सत्ता संघर्षात आपल्या पाठीमागे पदवीधर आमदार अरुण आण्णा लाड व क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांची मोठी ताकद आपल्याकडे वळवून आपला गड शाबूत ठेवण्यात विश्वजीत कदम यांना यश प्राप्त झाले असले तरीही भाजपा आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी कमीअधिक फरकाने असला तरीही लाखमोलाचा जनाधार आहे ही गोष्ट ही दुर्लक्षित करण्याजोगी निश्चितच नाही.

@ शरद जाधव

To Top