पलूस कडेगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी विधानसभेत जाण्याची संधी द्या : संग्राम देशमुख यांचे आवाहन; पलूस औद्योगिक वसाहतीत उद्योजक, कामगारां बरोबर संवाद
पलूस प्रतिनिधी: पलूस कडेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग यावेत, औद्योगिक विकास व्हावा आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी याकरिता भाजपा महायुती आग्रही आहे, उद्योजक आणि कामगारांच्या तसेच पलूस कडेगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी विधानसभेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले. पलूस औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी विविध ठिकाणी औद्योगिक अस्थापनांना प्रत्यक्ष भेटून कामगार व उद्योजक यांच्याशी संवाद साधला.
संग्राम देशमुख म्हणाले, राज्यभरातील विविध शहरांमध्ये औद्योगिक वसाहती व एमआयडीसीबाबत काही समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी उद्योजक आणि कामगारांना अनुकूल धोरण तयार करून रोजगार विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती काम करत आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास क्षेत्रात अनेक योजना आहेत. विशेषतः महिलांसाठीच्या योजना, रोजगार महिलांना मिळवण्यासाठी शासनाचे धोरण आगामी काळात राबविण्यात येईल. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात पाच हजार कोटींचे मदर युनिट सुरू करून भागातल्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, नवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील.
विविध कारखान्यांमध्ये उद्योजक आणि कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्योजक आणि कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन संग्राम देशमुख यांनी दिले. विविध उद्योग समूहाचे प्रमुख, विविध उद्योग संघटनाचे पदाधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते.