घासून नाही तर ठासून येणार: संग्राम देशमुख;घोगाव येथे जल्लोषात पदयात्रा
पलूस प्रतिनिधी : घासून नाही तर ठासून येणार आहे, असा विश्वास पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला. पलूस तालुक्यातील घोगाव येथे प्रचार दौऱ्यात जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली.
गावात ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत हालगीच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. सुहासिनींनी औक्षण केले. पदयात्रा संपल्यानंतर पदयात्रेचे रूपांतर सभेमध्ये झाले.
संग्राम देशमुख म्हणाले, घोगाव परिसरातील गावांमध्ये महापुराला तेव्हा महायुतीचे सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं होतं. आपल्याला तात्काळ नुकसान भरपाई दिली होती. महायुतीने लाडकी बहीण शेतकरी सन्मान अशा अनेक योजना राबवून त्याचा थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये दिला आहे. तुम्ही कोणत्याही घरात गेलात तर त्या घरातला कोणी ना कोणीतरी कोणत्यातरी योजनेचा लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळेल. घोगाव परिसरातून मला मताधिक्य मिळेल यात अजिबात शंका नाही. मतदारसंघात तर वातावरण अतिशय चांगला असून 1995 ची पुनरावृत्ती होणार आहे. समोरच्या उमेदवारांने मंत्री असताना तुमच्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे आता त्यांनी कितीही आगळे वेगळे प्रयोग केले. लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला. नको नको ते अमिषं दाखवली तरी यावेळी आपण घासून नाही तर ठासून येणार आहोत. असा विश्वास संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद पाणी पुरवठा समितीचे माजी सदस्य संदीप पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रोहित पाटील, उपसरपंच दत्तात्रय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, नंदकुमार माळी, शिवाजी चव्हाण, महादेव माळी, आनंदराव पाटील, मोहन पाटील, धनाजी चव्हाण, आशिष पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.