क्रांतीभूमी कुंडल मध्ये संग्राम देशमुख यांचे जंगी स्वागत; जनतेनेच निवडणूक हाती घेतल्याने विजय निश्चित
पलूस प्रतिनिधी :पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी आज क्रांती भूमी कुंडल येथे पदयात्रा काढली. कुंडलकरांनी जागोजागी फटाक्यांच्या आतषबाजीत हालगीच्या कडकडाटात जोरदार स्वागत केले. या निवडणुकीत संग्राम देशमुख यांना मताधिक्य देण्याचा संकल्प करण्यात आला.
येथील बस स्थानक चौकातून पदयात्रेस प्रारंभ झाला. आर. एस. पवार चौक, खारगे चौक, छत्रपती शिवाजीमहाराज चौक, अंबाबाई मंदिर, ग्रामपंचायत पंचायत चौक या मार्गावरून गावातील विविध गल्ल्यांमधून पदयात्रा काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करत तरूण तरूणींनी पदयात्रेत सहभाग घेतला. संग्राम देशमुख यांना गल्लोगल्ली सुहासिनींनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांनी आशिर्वाद दिले.
संग्राम देशमुख म्हणाले, मतदारसंघाचा विकास हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. गोड बोलणारी आणि अमीष दाखविणारी माणसं आता टिकू शकत नाहीत. जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे यावेळी आमचा विजय निश्चित होणार आहे.
भाजपा पलूस तालुका कोषाध्यक्ष राजेंद्र लाड, भाजपा पलूस तालुका चिटणीस नामदेव लाड, शिवाजी लाड, अविनाश माळी, उमेश लाड, सारंग माने, सुशांत कांबळे, सुरेश जंगम, पांडुरंग लाड, भाजपा पलूस तालुका सरचिटणीस अशोक लाड यांच्यासह शेकडो नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.