पर्यावरणाचे संतुलन राखणारी परसबाग स्पर्धा कौतुकास्पद - आ.डॉ.विश्वजीत कदम
भिलवडी प्रतिनिधी:
माझ्या वाढदिवसानिमित्त विश्व संवाद फाउंडेशनने महिला भगिनींच्या आवडी-निवडीला प्राधान्य दिले. निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी आणि पर्यावरणाचे संतुलन राखणारी परसबाग स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी केले. विश्वसंवाद फाउंडेशनच्यावतीने या परसबाग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्पर्धक हसीना शेख यांच्या परसबागेतच संपन्न झाला.परसबाग स्पर्धेसाठी पलूस तालुक्यातील २९ गावांतील ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड उपस्थित होते. यावेळी भिलवडी-माळवाडी परिसरातील बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते.आमदार कदम यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या उद्योगवाढीसाठी भारती बझारच्या माध्यमातून उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला प्रतिसाद दिला आहे. केवळ स्पर्धक म्हणून नाही तर एक पर्यावरण म्हणून आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली.
ताजेतवाने आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी विविध निसर्गवर्धक वनस्पतींची लागवड केली पाहिजे.पर्यावरणाचे संतुलन राखणे आज काळाची गरज आहे.रिसायकल आणि ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर करून पर्यावरणासाठी फायदेशीर असणारी परसबाग ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
विश्व संवाद फाउंडेशनचे सर्व उपक्रम प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. विश्वसंवाद फाउंडेशनच्या टीमने घरोघरी जाऊन परीक्षण केले. महिला स्पर्धकांनी सजवलेल्या परसबागा केलेले स्वागत आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मांडलेल्या विविध कल्पनांची चित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली.यामधून पुष्पा चंद्रकांत पाटील (पलूस) यांनी प्रथम क्रमांक, सुरेखा विकास चव्हाण (अंकलखोप),शोभा लक्ष्मण पाटील (पलूस) यांना विभागून द्वितीय, सरिता बबन येसूगडे (माळवाडी), सारिका निशिकांत वड्डीकर (सावंतपूर) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पहिल्या १३ क्रमांकासाठी होम गार्डनिंग कंपोस्ट खताच्या पिशव्या देण्यात आल्या.
स्वागत विश्वसंवाद फाउंडेशनचे प्रमोद जाधव, प्रास्ताविक मंगेश मोटे, आभार सुनील तुपे यांनी मानले.सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी स्पर्धक महिलांबरोबरच भिलवडी सरपंच सीमा शेटे, ब्रम्हनाळ सरपंच गीता गायकवाड, माळवाडी सरपंच सुरैया तांबोळी, खंडोबाचीवाडी सरपंच अश्विनी मदने, चोपडेवाडी सरपंच सुप्रिया माने, महिला काँग्रेसच्या श्वेता बिरनाळे, माधुरी सावंत, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या मीरा बहिणजी, स्नेहा शेडबाळकर, ग्रामपंचायत सदस्या रेहाना फकीर, रूपाली कांबळे,उषा पाटील यांच्यासह भिलवडी आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.
आ.डॉ.विश्वजीत कदम यांचे बैलगाडीतून आगमन.आ.डॉ.विश्वजीत कदम यांचे आगमन अनोख्या पद्धतीने झाले. विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने बैलगाडीतून त्यांची भव्य एन्ट्री झाली. ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला पारंपरिक आणि उत्साहवर्धक रंगत आली.
'आजीचा बटवा' आणि वाढदिवस साजरा.
विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने डॉ.कदम यांना ‘आजीचा बटवा’ देण्यात आला. त्यामध्ये मेथी, वेखंड, आवळा,सुंठ, गुळवेल, जेष्ठमध, त्रिफळा आणि दालचिनी यांचं चूर्ण होतं. बचत गटाच्या महिलांनीही त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाची दुरडी तयार करून विश्वजीत कदम यांना देत अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला.