पालक बंधूभगिनीनों मार्कवंत नव्हे ध्येयवंत विद्यार्थी घडवूया - शरद जाधव; सेकंडरी स्कूल मध्ये पालकांसाठी व्याख्यान
संवाद न्यूज भिलवडी प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात आपले बालक टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. मुलांची योग्यता,भावना,कल यांचा कोणताही विचार न करता,अपेक्षांचे ओझे लादून त्यांची अवस्था मशीन सारखी करून टाकली जात आहे.हे उद्याच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. योग्य वयात बाल मनांवर स्वप्नांची पेरणी करा. मार्कवंत नव्हे तर ध्येयवंत पिढी घडविण्यासाठी शाळा,बालक व पालकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन व्याख्याते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी मधील इयत्ता नववी, दहावी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पालकसभे निमित्त आयोजित 'सुजाण पालकत्व' या विषया वरील व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक मुकुंद जोग होते.
यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले की,मुलांचे मालकत्व सिद्ध करून त्यांच्या भावनेची मुस्कटदाबी न करता मैत्रीच्या भावनेतून त्यांच्याशी संवाद साधा. योग्य वेळी त्यांच्या मनात स्वप्नांची पेरणी करीत ती साकारण्यासाठी सकारात्मक पद्धतीने साथ द्या. आई बाबा होण्यापेक्षा पालक होण ही आव्हानात्मक बाब आहे,बालकाच्या मनात सुजाण विश्वास निर्माण करणे हेच खरे पालकत्व आहे.
यावेळी बोलताना मुकुंद जोग म्हणाले की, शिक्षक बालक आणि पालक असा त्रिवेणी समन्वय साधून कामकाज केल्यास निश्चित यश मिळू शकते.
सहसचिव के.डी.पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.अमृत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. सौ. आश्र्विनी बंडगर यांनी आभार मानले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक संभाजी सूर्यवंशी, सचिव मानसिंग हाके,मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, टी.एस.पाटील, एस.जे.सदामते, एस.व्ही.केंगार, सौ.आर.झेड.तांबोळी आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.